वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या तरुणीवर जबरी संभोग केल्याचा आरोप असलेले श्रीरामपूरचे डॉक्टर रवींद्र कुटे यांना औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता जामीन दिल्याची माहिती समजली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. कुटे फरार होते. गेल्या महिनाभराच्या कालखंडात पोलिसांना ते सापडलेच नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, श्रीरामपूरच्या अनेक महिला पोलिसांवर नाराज असून लवकरच श्रीरामपूर पोलिसांना बांगड्या देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांमार्फत समजली.
डॉ. कुटे यांना जामीन मिळविण्यासाठी पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे वेळ मिळाला असल्याचा आरोप महिलांमधून केला जात आहे. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक मगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डॉ. कुटे यांचा शोध घेण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला. त्यांच्या घरी आणि अन्य ठिकाणी शोध घेण्यात आला. तपास कामात पोलिसांनी कुठलीही कसर सोडलेली नाही. या दुर्दैवी घटनेतल्या पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न नेहमीच सुरु राहतील.
खरं तर किरकोळ गुन्ह्यातले आरोपी पोलिसांना लवकर सापडतात. अवैध दारु विक्री, मटका, जुगार असे धंदे करणारे आरोपी पोलिसांना सापडतात. मग बलात्काराचा आरोप असलेले आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत? यामध्ये आर्थिक तडजोड तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
… तर पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं काय?
बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे महिनाभराच्या कालावधीमध्ये फरार असलेले डॉक्टर कुटे पोलिसांना का सापडले नाहीत? पोलिसांचा गुप्तचर विभाग नक्की काय करतो? श्रीरामपूर पोलिसांकडे खबऱ्यांचं जाळं नाही का? पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे डॉक्टर कुटे यांना जामीन मिळविण्यासाठी वेळ मिळाला का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत.