अहिल्यानगरअचानक 'धन'लाभ झालेले अक्कलशून्य ; तर कर्ज काढून श्रीमंतीचा आव आणणारे महामूर्ख...!

अचानक ‘धन’लाभ झालेले अक्कलशून्य ; तर कर्ज काढून श्रीमंतीचा आव आणणारे महामूर्ख…!

Published on

spot_img

 रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर 

‘जिथं सरस्वती असते,  तिथं लक्ष्मी नसते आणि जिथं लक्ष्मी असते तिथं सरस्वती नसते’. आता तुम्ही म्हणाल, हे काय अचानक नवं? तर मित्रांनो, हे अचानकही नाही आणि नवंही नाही. हे सर्वांना माहीत असतं आणि अनेक जणांची सातत्यानं फसगत होते. तरी पण अनेक जण यातून बोध घेण्याऐवजी पुन्हा पुन्हा तीच चूक करताहेत, जी यापूर्वी अनेकांनी केलीय. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, अचानक ‘धन’लाभ झालेले अक्कलशून्य असतात. तर कर्ज काढून श्रीमंतीचा आव आणणारे हे निव्वळ महामूर्ख असतात.

या लेखात दोन मुद्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा हा, की अचानक ‘धन’लाभ झालेले अक्कलशून्य कसे? तर अनेकांना एखाद्या व्यवहारात, धंद्यांत किंवा हातचलाखीत अचानक कोट्यवधी रुपये मिळतात. आता हे सारे पैसे (खरं तर रुपये) राष्ट्रीयकृत बँकेत ठेवले तर एवढे सारे पैसे कुठून आणि कसे आले, या प्रश्नांची सरकारी यंत्रणेला उत्तरं देत बसावं लागणार. याशिवाय या पैशांवरचा कर चुकवला म्हणून फौजदारी कारवाई होईल, ती एक वेगळीच भानगड!

यावर मग तोडगा काय काढायचा, या विवंचनेत असताना अचानक एक शेअर मार्केटचा ‘बिग बुल’ कुठून तरी प्रगटतो आणि दुप्पट पैशांचं ‘गाजर’ दाखवून या नवख्या पण भांबावून गेलेल्या ‘इन्व्हेस्टर’ची चांगलीच ‘खोलून’ मारतो. एक दोन वेळा चांगला ‘रिटर्न’ म्हणजे परतावा दिला, की तो ‘बिगबुल’ अचानक तोंड काळं करत पळून जातो. त्यानंतर पोलीस तक्रार वैगेरे सोपस्कार होतात आणि आशावादी दिवस सुरु होतात.

दुर्दैवाची किंवा हास्यास्पद बाब ही, की झालेल्या आर्थिक फसवणुकीबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाण्याचीही अनेकांची मानसिक तयारी होत नाही. यालाही दोन कारणं असतात. एक म्हणजे ‘तो’ आपल्याला नक्कीच काही तरी ‘गाजर’  देईल आणि दुसरं हे की पोलिसांनी विचारलं, एवढे पैसे कुठून आले, तर काय सांगायचं?

… वेळ गेल्यावर केळं खाण्यात काय अर्थ…?

‘धरलं तर पळतंय, सोडलं तर चावतंय’ या म्हणीप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची अवस्था होते. जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषातून कमी कष्टांत हाती आलेले कोट्यवधी रुपये शेअर मार्केटचे धूर्त, कावेबाज ‘बिग बुल’ आणि एजंट मंडळी अवघ्या काही दिवसांत गायब करतात. पण वेळ गेल्यावर केळं खाण्यात जसा काहीच अर्थ नसतो, त्याप्रमाणे गुंतवणूकदारांची मोठी दयनीय अवस्था होते.

आता कर्ज काढून श्रीमंतीचा आव आणणारे महामूर्ख कसे, यावर एक नजर टाकूया. ‘अंथरुण पाहून पाय पसरावेत’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अनेक जण या म्हणीचा कुठलाच विचार करत नाहीत. ‘स्टॅंडर्ड लाईफ मेंटेन’ करण्यासाठी किंवा तोट्यात असलेल्या धंद्याला चालना देण्यासाठी अनेक जण कर्ज काढतात. यासाठी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट, मल्टिसिटी निधी फायनान्स कंपन्या आणि बेकायदा सावकारांचे उंबरठे झिजविले जातात. या सर्वच ठिकाणी कर्जावर भलं मोठ्ठं व्याज आकारलं जातं. काढलेल्या कर्जाचे व्याज भरुन भरुनच कर्जदार मेटाकुटीला येतो. त्यामुळे अंथरुण पाहून पाय न पसरल्याचा हा परिणाम कर्जदाराला भोगावा लागतो. जर स्वतःच्या आशा, आकांक्षा कमी केल्या असत्या  कर्जाचा डोंगर होऊ दिला नसता तर ही वेळ आलीच नसती. मग तुम्हीच सांगा, हा महामूर्खपणा नाही तर दुसरं काय आहे? 

आणखी महत्वाच्या बातम्या