नेवासे तालुक्यातल्या सोनई पोलीस ठाण्यासमोर सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसळकर यांनी दोन दिवस उपोषण केलं. तिसऱ्या दिवशी व्यापारी असोसिएशनच्यावतीनं सोनई पोलिसांना निवेदन देण्यात आल्यानंतर हे उपोषण थांबविण्यात आलं. मात्र आता संदीप कुसळकर आणि त्यांचे वडील अशोक जगन्नाथ कुसळकर यांच्यासह अन्य व्यक्तींच्या कथित अन्यायाविरुद्ध अनिल औटी दि. 8 ऑगस्ट रोजी एस. पी. कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आलेल्या निवेदनात औटी यांनी म्हटले आहे, की औटी यांचे गाळे जमीनदोस्त करुन कुसळकर यांनी औटी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कुसळकर यांच्यापासून स्वतःसह औटी यांच्या कुटुंबियांच्या जिविताला धोका निर्माण झाला असून पोलीस प्रशासनानं योग्य न्याय न दिल्यास औटी हे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती औटी यांनी राज्याचे गृहमंत्री, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नगरचे जिल्हाधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सोनई पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोनईचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिल्या आहेत.