बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
तमाम नारी शक्तीला खरं तर अबला म्हणायची आमची मुळीच इच्छा नाही. पण परिस्थितीच तशी तयार झाली आहे. किंबहुना तशी परिस्थिती तयार करण्यात आली आहे. ज्यांनी ही परिस्थिती तयार केलीय, त्यातले काही ‘वासनांध’ ‘पुरुष’ ‘पिसाळले’ आहेत. त्यामुळे अबला झालेल्या तमाम नारीशक्तीने आता दुर्गेचा अवतार धारण करायलाच हवाय.
कोणी तरी असं म्हटलंय, की ‘There is no love But There is a lust’. अर्थात या जगात प्रेम नावाची गोष्ट नाहीच. तर प्रेमाच्या नावाखाली फक्त कामवासना तृप्त करण्याची वासनांध पुरुषांची इच्छा आहे. एखाद्या मुलीला किंवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा यथेच्छ ‘भोग’ घेण्याची मानसिकता हल्ली तयार झाल्याचं पहायला मिळत आहे. ‘प्रेमाच्या जाळ्यात’ हे शब्द इथं आम्ही जाणीवपूर्वक वापरत आहोत. कारण प्रेमाचं नाटक करुन वासनांध पुरुष त्यांची ‘ती’ इच्छा पूर्ण करून घेत आहेत. मात्र हे खरं प्रेम आहे का, याचा विचार आता संपूर्ण नारीशक्तीनं करायला हवा. कारण खऱ्या प्रेमात ‘इंद्रिय तृप्ती’चा स्वार्थ कधीच नसतो.
मुली किंवा महिला या फक्त ‘भोगवस्तू’च आहेत, असा गैरसमज झालेल्या अनेक वासनांध पुरुषांकडून ‘ति’च्या अब्रूचे धिंडवडे उडवले जात आहेत. म्हणूनच आता अबला नसलेल्या पण अबला करणाऱ्या वासनांध पुरुषांना कायमचा धडा शिकविण्यासाठी नारीशक्तीने आता दुर्गेचा अवतार धारण केल्याशिवाय पर्याय नाही. पोलीस, कायदा, कोर्ट हे सारं तुमच्या पाठीशी आहेच. पण त्यासाठी खूप कालावधी जाऊ द्यावा लागतो. तत्पूर्वी जर तुमच्यावर अशी वेळ आलीच, तर सर्वात आधी तुम्ही राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मां साहेबांसह तमाम शौर्यवान रणरागिणींचं स्मरण करा.
एखाद्या मुलीचे अथवा महिलेचे ‘न्युड’ फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ‘ब्लॅकमेल’ करत अनेक वासनांध पुरुष तिचा ‘भोग’ घेत आहेत. अशा वासनांध पुरुषांना वठणीवर आणण्यासाठी नारीशक्तीला पुन्हा एकदा सांगत आहोत, आता दुर्गेच्या अवताराशिवाय पर्यायच नाही. महिला अत्याचाराच्या बातम्या अलीकडे खूपच यायला लागल्या आहेत. खरं तर केंद्र आणि राज्य सरकारची ही जबाबदारी आहे, की राज्यघटनेच्या कलमांमध्ये दुरुस्ती करुन महिलांवर अत्याचार बलात्कार करणाऱ्या वासनांध पुरुषांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी.
सासर्याकडून सुनेवर, बापाकडून मुलीवर, चुलत्याकडून चुलतीवर, चुलत भावाकडून चुलत बहिणीवर, आत्याच्या मुलाकडून मामाच्या मुलीवर, शेजारच्या मुलाकडून शेजारच्या मुलीवर, एवढंच नाही तर साठी ( वयाची ६० वर्षे) ओलांडलेल्या आईच्या वयातल्या महिलांवरदेखील बलात्कार केले जात आहेत.
साडेतीनशे वर्षांपूर्वी यवणांकडून असे बलात्कार केले जायचे. इतिहासात आपण हे वाचलं असेलच. पण आता आपल्यातच अनेक ‘यवन’ तयार झाले आहेत. अशा यवनांचा नायनाट करण्यासाठी खरंच दुर्गेच्या अवताराशिवाय पर्याय नाहीच.
दुर्गेचा अवतार धारण करणं म्हणजे एखाद्याचा खून करणं नव्हे. तर स्वतःचा बचाव स्वतःच करणं आणि त्यासाठी सर्व शक्ती एकवटून वासनांध पुरुषाचा हल्ला परतवून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करणं हा अर्थ आम्हाला यातून अभिप्रेत आहे. बाकी तुम्ही समजूतदार आहात. यापुढे बलात्काराचा प्रसंग आल्यास जशास तसं उत्तर द्या. हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.