रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विश्व हरिनाम संकीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं अमेरिकेहून आलेले श्रीमान श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांचं नगरच्या इस्कॉन मंदिरात भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. नगर इस्कॉनच्या हरे कृष्ण मंदिरात तीन दिवस त्यांचा सत्संग होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी नगर इस्कॉनचे गृहस्थ आणि ब्रह्मचारी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हरे कृष्ण महामंत्राच्या जयघोषात श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांचं नगर इस्कॉनच्या हरे कृष्ण मंदिरात आगमन झालं.
दरम्यान, भाद्र पौर्णिमेचं औचित्य साधून नगर इस्कॉनच्या हरे कृष्ण मंदिरात भव्य दिव्य अशा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. वैदिक मंत्रांच्या ध्वनीमध्ये या यज्ञात आहुती टाकण्यात आली. नगर इस्कॉनच्या हरे कृष्ण मंदिराचे प्रमुख श्रीमान गिरीवरधारी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मदन मनोहर प्रभू यांनी या यज्ञ सोहळ्याचं पौराहित्य केलं. नगर इस्कॉनचे वरिष्ठ भक्त श्रीमान वैष्णवतोष्णी प्रभू आणि अन्य कृष्ण भक्तांनी या यज्ञ सोहळ्यात यजमानपद भूषवलं.
याप्रसंगी श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांचं सुश्राव्य असं प्रवचन झालं. ‘आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला असून दोन वर्षांपूर्वी मी या ठिकाणी आलो होतो. अहिल्यानगर इस्कॉनच्या भक्तांनी माझं जे स्वागत केलं, आणि या सर्व कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद’, असं म्हणत त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली.
‘या ब्रह्मांडातले सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णांचे सेवक आहेत. तुम्ही – आम्ही बहीण, भाऊ हे सारे भगवंतांचे अंश आहेत. भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सर्वांचे पिता आहेत आणि ही सृष्टी आपली माता आहे. आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. भगवंतांचा दिव्य महामंत्र ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे … हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ हा आपल्या मनात साचलेली धूळ नष्ट करतो आणि आपल्याला भगवंतांकडे जाण्यासाठी सहाय्य करतो’, अशा दिव्य उपदेशांनी परिपूर्ण असलेल्या या पवित्र आणि अध्यात्मिक प्रवचनाचा नगर इस्कॉनच्या भक्तांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला.
याप्रसंगी 32 कृष्णभक्तांनी ग्रंथराज श्रीमद्भागवत या पवित्र ग्रंथाचे 12 स्कंध असलेले 32 संच विकत घेतले. श्रीकृष्ण चैतन्य स्वामी यांच्या हस्ते हे संच या भक्तांना
सन्मानपूर्वक देण्यात आले. उपस्थित सर्व कृष्ण भक्तांसाठी हरे कृष्ण मंदिराच्यावतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.