बाळासाहेब शेटे पाटील
मो. नं. 7028351747
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 8 टक्के परतावा (रिटर्न) देण्याचं आमिष दाखवत 12 जणांची 66 लाख रुपयांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या दरंदले गल्लीत राहणाऱ्या अमोल उर्फ तुका शंकर दरंदले आणि त्याचा भाऊ विक्रम शंकर दरंदले या दोघा भावांच्याविरुद्ध छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीरामपूर तालुक्यातल्या वैभव ज्ञानेश्वर मुठे (रा. मुठेवडगाव, हल्ली मुक्काम कुंभेफळ) हा छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये एका औषधी कंपनीत काम करत होता त्यावेळी अमोल शंकर दरंदले (रा. सोनई ता. नेवासा) याच्यासोबत ओळख झाली. पाच महिन्यांपूर्वी अमोलनं वैभव मुठेला सांगितलं की, तू आणि त्याचा भाऊ विक्रम दरंदले या दोघांनी सिडको वाळूज महानगरात ए एस एंटरप्राइजेस या नावाने शेअर मार्केटचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून आम्हाला चांगल्यापैकी ‘इन्कम’ होत आहे. तू जर आमच्याकडे पैसे गुंतवले तर दर महिन्याला आठ टक्के प्रमाणे तुला आम्ही परतावा देऊ.
या आमिषाला भुलून वैभव मुठे यानं दिनांक 4 जून रोजी अमोलच्या खात्यावर प्रत्येकी 4 लाख 99 हजार रुपये आणि पाच जून रोजी 4 लाख 92 हजार असे एकूण 14 लाख 99 हजार रुपये जमा केले. वैभव मोठे याच्या या गुंतवणुकीवर अमोल दरंदले यानं दिनांक 12 जुलै रोजी 99 हजार 999 रुपये आणि 16 जुलै रोजी 50 हजार आणि 1 लाख 49 हजार रुपये वैभव ला फोन पे द्वारे पाठवले.
चांगला परतावा (रिटर्न) मिळत असल्यानं वैभव मुठे यानं त्याच्या मित्रांनादेखील आर्थिक गुंतवणूक करायला भाग पाडलं. त्यानुसार सतीश राहणे (राहणार घाणेगाव) याने 1 लाख रुपये, दिनेश राजपूत (राहणार सिडको, महानगर वाळूज) याने एक लाख 98 हजार 999 रुपये, तुषार सुपेकर (राहणार चिकलठाणा) यानं 9 लाख 73 हजार रुपये, संतोष शेट्टी (राहणार बीड बायपास) यानं 4 लाख 99 हजार 993 रुपये, दीपक पांडे (राहणार सातारा परिसर) याने 3 लाख 50 हजार रुपये, संदीप शेळके (राहणार वैजापूर) याने एक लाख 99 हजार रुपये आदींसह अनेकांनी 66 लाख रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली होती.
सत्य परेशान होता हैं…!
अमोल तुका शंकर दरंदले या शेअर मार्केटच्या ‘मास्टरमाईंड’नं आणखी कोणा कोणाला फसवलं आहे, शेवगाव शेअर मार्केटच्या आर्थिक घोटाळ्याशी दरंदलेच्या या घोटाळ्याचे ‘कनेक्शन’ आहे का, या ‘रॅकेट’मध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे, याचा तपास छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
गुंतवणूकदारांनो, निर्भिडपणे समोर या…!
शेअर मार्केटमध्ये शेवगाव तालुक्यात यापूर्वी अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती पुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित एजंट मंडळींनी पोबारा केला. गुंतवणूकदार मात्र तोंडात मारल्यासारखे गप्प बसले होते. छत्रपती संभाजीनगरच्या गुंतवणूकदारांनी मात्र धाडस करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, सोनईच्या अनेक गुंतवणूकदारांचे 50 ते 60 लाख रुपये या घोटाळ्यात अडकले आहेत. या सर्वांनी निर्भिडपणे समोर येऊन पोलिसांकडे तक्रार द्याव्यात, असं आवाहन आम्ही संबंधित गुंतवणूकदारांना यानिमित्तानं करत आहोत, धन्यवाद.