बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या शहरातल्या तब्बल ११९ शाळांच्या मुख्याध्यापकांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शाळांकडून कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली नसल्यानं ही कारवाई केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून हा कारवाईचा बडगा उभारण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीनं निवडणुकीच्या कामासाठी सर्व सरकारी कार्यालये, शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली होती. ज्यात जिल्ह्यातील ११९ शाळांनी आपल्या शिक्षकांच्या याद्या आणि त्यांची माहिती सादर केली नाही.
परिणामी या शाळांच्या मुख्याध्यापकांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. त्यामुळे या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रत्यक्षात नेमकी कधी कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.