अहमदनगर पत्रकार संघाच्या चुरशीने मात्र तेव्हढ्याच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट (पीपीएफ) पॅनलच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळालं. जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंटचे उमेदवार अनिल लगड (दै. सकाळ) यांची अध्यक्षपदी तर संदीप रोडे(दै. पुढारी) यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली. तसेच कार्यकारिणीसह इतर 17 जागांपैकी 13 पदावर पीपीएफचे उमेदवार निवडून आले. अहमदनगर शहरात लोकशाही मार्गाने झालेल्या पत्रकारांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत शिवाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट(पीपीएफ) आणि सुधीर लंके यांच्या नेतृत्वाखाली डेमॉक्रॅटिक मीडिया फ्रंट (डीएमएफ) या दोन पॅनलसह संघाचे काही सदस्य अपक्ष पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. खजिनदारपदी पीपीएफ पॅनेलचे सुनील चोभे (दै. नगर सह्याद्री) यांची बिनविरोध निवड झाली होती. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत पीपीएफ पॅनलचे अनिल लगड अध्यक्ष, संदीप रोडे सचिव या पदासह उपाध्यक्षपदी सुशील थोरात (साम न्यूज), सहसचिवपदी दौलत झावरे(दै. सकाळ), न्यूज चॅनेल प्रतिनिधीपदी सुनील भोंगळ(एबीपी माझा), फोटोग्राफर प्रतिनिधीपदी समीर मण्यार यासह, सर्वसाधारण कार्यकारणीवर अल्ताफ कडकाले(दै. सकाळ), बाळासाहेब धस(दै. केसरी), राजेंद्र त्रिमुखे (दै. देशोन्नती), सचिन दसपुते(दै. सार्वमत), संदीप जाधव(दै. नगर टाईम्स), सूर्यकांत वरकड(दै. पुढारी) हे सर्व पीपीएफ’चे उमेदवार बहुमताने निवडून आले.
उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही पॅनलमधील राजेंद्र झोंड आणि चंद्रकांत शेळके यांना समान मते मिळाली. डेमोक्रॅटिक मीडिया फ्रंट(डीएमएफ)चे चंद्रकांत शेळके(दै. लोकमत) यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. डेमोक्रेटिक पॅनेलचे सहखजिनदार, अरुण वाघमोडे (दै. लोकमत) सर्वसाधारण कार्यकारिणी सदस्य आणि अन्सार सय्यद (फौजदार टाईम्स) साप्ताहिक प्रतिनिध पदी निवडून आले.
दरम्यान, साप्ताहिक प्रतिनिधीसाठी शिर्के यांच्या पॅनलने उमेदवार दिला नव्हता. एकंदरीत चुरशीने मात्र मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या अहमदनगर पत्रकार संघाच्या निवडणुकीत पीपीएफचे वर्चस्व स्पष्ट झाले. दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून चोख काम बजावले. त्यांना मतदानकक्ष आणि मतमोजणी प्रक्रियेत श्रीराम जोशी, रावसाहेब पटारे, अरविंद आराखडे, भावसार यांनी मोलाची मदत केली. निवडून आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
‘या’ आहेत नव्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा…!
पत्रकार भवनची निर्मिती, पत्रकारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी भरघोस प्रयत्न करणं, पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मिळवून देणं, पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारी पातळीवर सातत्यानं पाठपुरावा करणं, बोगस, तोतया पत्रकारांविषयी पोलीस खात्याला माहिती देणं या आणि अशा अनेक प्रकारच्या अपेक्षा अहमदनगर पत्रकार संघाच्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी रोखठोक 24 न्युज नेटवर्कच्या खूप खूप शुभेच्छा…!