जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बेशिस्त शहर कोणतं, असा एक प्रश्न जर एखाद्यानं विचारला तर ताबडतोब अहमदनगर हे नाव पुढे येतं. या परिस्थितीला नगर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि या विभागाचे पथक हेच कारणीभूत आहे. शहराच्या कुठल्याही भागात गेलं तरी हातगाड्या आणि त्यासमोर लावण्यात आलेली दुचाकी – चारचाकी वाहनांची रांग दिसते. अतिशय अस्ताव्यस्तपणे ही वाहनं लावलेली असतात. या परिस्थितीवरून नगर महापालिकेचे अतिक्रमण पथक सध्या प्रचंड ढेपाळलं आहे, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
सावेडी परिसरातल्या आकाशवाणी केंद्रासमोर आणि नगर तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या चहाच्या गाड्या आणि त्या गाड्यांसमोरील लावण्यात येणारी दुचाकी त्याचप्रमाणं चार चाकी वाहनं या परिसरातली मोठी समस्या झाली असून पादचाऱ्यांसाठी ही मोठीच डोकेदुखी ठरत आहे.
अर्थात ही समस्या एकट्यावेळी उपनगरातच नाही. तर केडगाव, बोल्हेगाव, कुष्ठधाम रोड, पाईपलाईन रोड अशा अनेक भागांमध्ये ही समस्या दिसत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आणि त्या विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवणाऱ्या पथकाचे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे नगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं लवकरच एक मोहीम हाती घ्यावी आणि सातत्यानं ही मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.