बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
कोरोना व्हायरस किंवा covid 19 ची जगभरात पहिली लाट जेव्हा आली, त्यावेळी अहमदनगर महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आला. या घोटाळ्याचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. मात्र या तपासाचं पुढं काय झालं? हा आर्थिक घोटाळा गुंडाळला गेला तर नाही ना? अशी शंका सध्या व्यक्त केली जात असून नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे यामध्ये घालतील का लक्ष? टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना पाडतील का उघड? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कोविडच्या पहिल्या लाटेत ज्या ज्या खासगी दवाखान्यांना कोविडवर केल्या जाणाऱ्या उपचाराची परवानगी दिली, त्यापैकी सर्वच नाही मात्र काही दवाखान्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिकदृष्ट्या प्रचंड लुटलं. त्यावेळी रुग्णांना सहजासहजी खाटा उपलब्ध होत नव्हत्या. रेमडिसिविर इंजेक्शन मिळत नव्हतं. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक खासगी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी रुग्णांना खाटा, ऑक्सिजन आणि रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी लाखो रुपये उकळले.
ज्या रेमडिसिविर इंजेक्शनची किंमत 4 हजार 500 रुपये होती, ते इंजेक्शन 40 ते 50 हजार रुपयांना असल्याचं दाखवलं. सर्वच नाही परंतू काही डॉक्टरांनी अक्षरशः मृतदेहावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा निंदनीय पराक्रम केला. डॉक्टरांसाठी आवश्यक असणाऱ्या पीपीई किट्सचे पैसेदेखील रुग्णांच्या नातेवाइकांकडूनच उकळण्यात आले. त्यामुळे या सर्व आर्थिक घोटाळ्याचा थांबलेला तपास पुन्हा एकदा सुरु करण्यात यावा आणि महापालिकेचा जो आरोग्य विभाग आहे, त्या विभागाच्या प्रमुखासह जे जे खासगी डॉक्टर दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी नक्कीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे.
‘ती’ याचिकादेखील अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच…!
सावेडी परिसरातल्या एका डॉक्टरनं पाईपलाईन रोड भागातल्या एका बिल्डरच्या धडधाकट असलेल्या वडिलांना बळजबरी कोविड दाखवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तब्बल दररोज दोन लाख रुपये उकळले. दोन महिन्यांचे साठ लाख रुपये या डॉक्टरनं उकळल्यानंतर त्याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. मात्र त्या याचिकेचं पुढं काय झालं, हेदेखील गुलदस्त्यातच आहे.
खासदार निलेश लंके आहेत अनुभवी लढवैय्या नेते…!
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात शरद पवार कोविड सेंटर या नावाने त्यावेळी आमदार असलेले आणि विद्यमान खासदार निलेश लंके यांनी यशस्वीरित्या चालवलं. त्या कोविड सेंटरचं सर्वत्र कौतुक झालं. अनुभवाच्या जोरावर खासदार लंके यांनी आता महापालिकेतल्या कोविड काळात झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण खासदार लंके हे आंदोलन करण्यात आणि कोविड सेंटर चालवण्यात अनुभवी आणि ते एक लढवैय्या नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.