रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहराच्या सावेडी उपनगरात असलेल्या गुलमोहररोड परिसरात पारिजात कॉर्नर चौकाच्या अगदी जवळच एका व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी भला मोठ्ठा खोल खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात शेजारच्या नाल्याचं पाणी आलं आहे. अनेक दिवसांपासून साचून राहिलेल्या या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. परिणामी पारिजात कॉर्नर चौक भागातल्या स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असून मलेरिया, डेंग्यू अशा आजारांची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गंगाराम हिरानंदानी आणि सचिन कटारिया हे दोघं पारिजात कॉर्नर चौकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर या व्यावसायिक इमारतीचे (कमर्शियल बिल्डिंग) बांधकाम करण्यात येणार आहेत. बहुमजली असलेल्या या इमारतीमध्ये दुकानांसाठी गाळे बांधण्यात येणार आहेत. मात्र या बांधकामाजवळून एक नाला वाहत जातो. त्या नाल्याचं पाणी या खोल खड्ड्यात साचलं आहे. लहान मुलं खेळता खेळता या खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे. संबंधित सरकारी यंत्रणेनं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेचा बांधकाम विभाग आणि नगरचं तहसील काढतंय झोपा…!
गुलमोहर रोड परिसरातल्या पारिजात कॉर्नर चौकापासून जवळ असलेल्या संबंधित इमारतीच्या बांधकामासाठी जो खोल खड्डा खोदण्यात आला आहे, त्यासाठी नगरच्या तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का, संबंधितांनी यासाठी रॉयल्टी भरली आहे का, अहिल्यानगर महापालिकेच्या बांधकाम विभागाची यासाठी परवानगी आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
या भागातल्या नागरिकांच्या आरोग्याची एवढी मोठी समस्या निर्माण झाली असताना अहिल्यानगर महापालिकेचा बांधकाम विभाग, नगर रचना विभाग आणि नगरचं तहसील कार्यालय मात्र प्रचंड बेजबाबदारपणे झोपा काढत आहे.