अनंत कोटी ब्रम्हांडाचे सर्वोच्च नियंत्रक असलेले भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माष्टमीनिमित्त काल (दि.२६) आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनच्या अहिल्यानगर शाखेच्यावतीनं आयोजित करण्यात आलेला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. पाईपलाईन रस्त्यालगतच्या कादंबरीनगरी इथं हजारो कृष्णभक्तांच्या उपस्थितीत हा रमणीय सोहळा संपन्न झाला. नगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत श्रीकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक घातला.
पुणे इस्कॉनचे वरिष्ठ ब्रह्मचारी भक्त श्रीमान चैतन्यचंद्र प्रभू यांचं सुश्राव्य असं प्रवचन यावेळी पार पडलं. भगवान श्रीकृष्णांनी एखाद्याला धरलं तर ते त्याला सहसा सोडत नाहीत. आपल्या स्तनांना कालकूट विष लावून अवघ्या सहा वर्षांच्या श्रीकृष्णांना ठार मारण्यासाठी आलेली पुतणा राक्षसी सोड सोड म्हणत असतानादेखील भगवंतांनी तिला सोडलं नाही. मातेचा दर्जा तिला आणि तिचा उद्धार केला, असं सांगत भगवान श्रीकृष्णाच्या जन्म आणि कर्माचं सविस्तर असं वर्णन श्रीमान चैतन्यचंद्र हा प्रभू यांनी केलं.
हजारो कृष्ण भक्तांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी सर्वांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आलं. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चिमुकल्या कृष्णभक्तांसह तरुण कृष्णभक्तांनी सुंदर नाटिका सादर केली.