अहिल्यानगरअहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते प्रचंड तणावग्रस्त ; 'किंगमेकर' माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले...

अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते प्रचंड तणावग्रस्त ; ‘किंगमेकर’ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या भूमिकेकडे लागलंय अनेकांचं लक्ष…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. जागा वाटपाचा घोळही लवकरात लवकर मिटणार आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप

आणि त्यांचे स्नेही माजी महापौर संदीप कोतकर

यांच्यात संभाव्य लढत होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास नक्की कोणाचं काम करायचं, या विवंचनेत सापडलेले कार्यकर्ते प्रचंड तणावग्रस्त आहेत. कारण आमदार जगतापांचं काम केलं नाही तर ते नाराज होतील आणि कोतकरांचं काम केलं नाही तर तेसुद्धा नाराज होतील. अशा परिस्थितीत ‘किंगमेकर’ असलेले माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या अनुपस्थितीत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात अनेक प्रकारची कामं करण्यात आली. ही कामं करण्यासाठी कोतकर यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री कर्डिलेंच्या सल्ल्यानुसार आमदार जगताप यांची मदत घेतली. परंतु कोतकर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची दाट शक्यता असल्यामुळे जगताप आणि कोतकर यांच्यापैकी नक्की कोणाचं काम करायचं, असा प्रश्न कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. एक प्रकारे कार्यकर्त्यांची यामध्ये ‘गोची’ झाली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

असं असलं तरी कोतकर आणि जगतापांपैकी कोणाकडून तरी ‘कामाला लागा’ अशा सूचना येतीलच. अशावेळी काय करायचं, या विचारानं कार्यकर्ते चांगलेच ‘टेन्शन’मध्ये आले आहेत. दरम्यान, संदीप कोतकर यांच्या अनुपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत ज्यांना ‘तिकडं’ जायचं त्यांनी खुशाल जावं, असं सांगण्यात आल्याची चर्चा आहे. परंतू निवडणुकीनंतर आपल्याला काही त्रास तर होणार नाही ना, हा प्रश्नदेखील कार्यकर्त्यांना सतावत आहे.

कोतकर आणि जगताप हे दोघेही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत. माजी मंत्री कर्डिले यांच्या शब्दाखातर अनेक कार्यकर्ते संदीप कोतकर यांच्या अनुपस्थितीत आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. मात्र संदीप कोतकर निवडणूक रिंगणात उतरले तर कार्यकर्त्यांना कोणता आणि नक्की कोणाचा झेंडा घेऊ हाती’, असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी ‘टेन्शन’मध्ये असलेले या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माजी मंत्री कर्डिले कोणाला बसवतील खाली…?

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात जगताप कोतकर या संभाव्य लढतीवरुन मोठा पेज निर्माण झाला आहे. हे दोघही निवडणूक रिंगणात उभे राहिल्यास एकमेकांच्या मतांचा एकमेकांना फटका बसण्याची आणि दुसराच उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला तरी थांबावंच लागणार आहे. अशा परिस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे आमदार जगताप आणि माजी महापौर कोतकर यांच्यापैकी नक्की कोणाला थांबवतील किंवा खाली बसवतील, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या