अहिल्यानगर... आणि असा झाला 'भाग्य लक्ष्मी'चा उदय...! भारत पुंड यांनी दीड कोटी...

… आणि असा झाला ‘भाग्य लक्ष्मी’चा उदय…! भारत पुंड यांनी दीड कोटी रुपयांना विकत घेतलं हे लायसन्स…! पहिल्याच महिन्यात आणली ‘फॉर्च्यूनर’…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

तब्बल 57 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करत फरार झालेल्या भारत बबन पुंड या चमत्कारिक माणसाच्या एक एक ‘भानगडी’ आता समोर यायला लागल्या आहेत. नगर जिल्ह्यातल्या एका नामांकित मल्टीस्टेटच्या संस्थापकाचा सख्खा भाचा असलेल्या भारत पुंड यांनी यापूर्वी मामाच्या त्या मल्टीस्टेटमध्ये एक कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून त्यांच्या सख्या मामाला अक्षरशः ‘मामा’ बनवलंय. त्यानंतर धनदायिनी नावाची मल्टिसिटी निधी बँक स्थापन केली. त्या संस्थेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी यायला लागल्या. त्यानंतर भारत पुंड यांचं नशीब चांगलंच फळफळलं.

भारत पुंड यांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका मित्राकडून तब्बल दीड कोटी रुपयांना ‘भाग्य लक्ष्मी’ मल्टीस्टेटचं लायसन्स विकत घेतलं. अशा पद्धतीनं भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेटचा उदय झाला. या तथाकथित यशानंतर भारत पुंड यांनी लगेचच 51 लाख रुपयांची अलिशान अशी फॉर्च्यूनर कार आणली. नगरच्या पाईपलाईन रोड परिसरात भिस्तबाग चौकाजवळ शेजवळ हाईट्स या भव्य दिव्य कॉम्प्लेक्समध्ये ‘भाग्य लक्ष्मी’ मल्टीस्टेट या संस्थेचे ‘कार्पोरेट ऑफिस’ थाटलं. वडील, भाऊ, सासरे, मेहुणे, साडू अशा सर्वच नातेवाईकांना या मल्टीस्टेटच्या संचालकपदी विराजमान केलं.

नगर जिल्ह्यातल्या नामांकित मल्टीस्टेटचे संस्थापक असलेल्या संचालकाचं अर्थात भारत पुंड यांच्या मामाचं आणि पुंड यांचे संबंध यापूर्वीच विकोपाला गेले होते. त्यामुळे त्या मामांनी पुंड यांना आर्थिक मदत करायला साफ नकार दिला आणि ‘यात माझा काहीही संबंध नाही’, असं म्हणत हात वर केले. ‘घर फिरलं की घराचे वाशे फिरतात’, या म्हणीप्रमाणे भारत पुंड या आर्थिक घोटाळ्यात अडकत गेले. पुंड यांचे सासरे, साडू, मेहुणे, भाऊ अशा सर्वांनीच हात वर केल्यामुळे पुंड यांच्यावर तोंड लपवून रहायची वेळ आली आहे.

शेजवळ सर विचारताहेत, भारत पुंड कुठं भेटंल?

पाईपलाईन रोड परिसरातल्या शेजवळ हाईट्सचे मालक असलेले शेजवळ सर यांना भारत पुंड यांनी सुरुवातीला शेजवळ सर यांच्या चांगलं मनाजोगतं भाडं दिलं. नंतर मात्र भाड्याचे पैसे थकले. शेजवळ हाईट्स ही भव्य दिव इमारत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चार सहा महिन्यांचं भाडे बुडाल्यानं आर्थिक नुकसानदेखील झालं आहे. त्यामुळे शेजवळ सर विचारताहेत, की भारत पुंड कुठं भेटंल?

तोफखाना पोलीस ठाण्यात आज होणार गुन्हा दाखल?

भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेट संस्थेचे अनेक ठेवीदार तोफखाना पोलीस ठाण्यात दोन-तीन दिवसांपूर्वी गेले होते. आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार या ठेवीदारांनी तोफखाना पोलिसांकडे दिली. दरम्यान, हे ठेवीदार एस. पी. ओला यांनादेखील भेटले. एस. पी. ओला यांनी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना तोफखाना पोलिसांना केल्या. ठेवीदारांचा आक्रोश विचारात घेता तोफखाना पोलिसांनी भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन भारत बबन पुंड यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. एका जबाबदार अधिकाऱ्यानं या संदर्भात ही माहिती दिलीय. कदाचित आज (दि. ३१) संध्याकाळपर्यंत भारत पुंड यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या