रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
‘स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात असे उमेदवार उभे राहणार आहेत, की ज्यांचा सामान्यांच्या प्रश्नांशी काहीच संबंध नाही. कुठल्याही प्रश्नावर त्यांनी मोर्चे काढले नाहीत. शंकरराव मात्र तुरुंगात गेले. अनेक प्रश्नांवर मोर्चे त्यांनी काढले. त्यामुळे निवडणूक रिंगणात कोणीही असू द्या. या निवडणुकीत शंकरराव गडाखांना 50 ते 60 हजार मताधिक्यांनी निवडून आणा, असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केलं.
नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. यावेळी कडूबाळ कर्डिले, अशोकराव गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार शंकरराव गडाख म्हणाले, ‘सत्ताधारी यंत्रणेकडून आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारखान्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. मुळा एज्युकेशन संस्थेला जागा खाली करण्याचे सांगितलं जात आहे. मला खुनाच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या संकटांपेक्षा सामान्य माणसाला जो त्रास झालाय, त्यासाठी आम्ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक रस्त्यांची कामं रखडली. पाणी योजना रखडल्या. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प रखडला. 120 कोटी रुपये सहा टक्के व्याजदरानं केंद्र सरकार कर्ज देत असतानादेखील राज्य सरकारनं ते दिलं नाही. अशा अनेक प्रकारची संकटं आपल्याला आली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर आणि तुमच्या आशिर्वादावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत’.
‘उतारा चालू आहे’, असं का म्हणाले यशवंतराव गडाख?
‘आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळीचा सण आहे. गोडधोड खा. आपला उतारा चालू आहे. गावोगावी उतारे होणार आहेत, असं वक्तव्य ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी या मेळाव्यात बोलताना केलं. मात्र या वक्तव्याचा मतितार्थ भल्याभल्यांना समजला नाही. ज्येष्ठ नेते माजी खासदार गडाख यांनी असं वक्तव्य का केलं असेल, याचीच उपस्थितांमध्ये चर्चा होती.
आमदार शंकरराव गडाख 28 ला उमेदवारी अर्ज भरणार…!
या मेळाव्यात बोलताना आमदार शंकरराव गडाख यांनी सरकारवर सडकून टीका केली. आपल्यासमोर पंच पक्वानाचं ताट वाढवून देण्यात आलं होतं. आपल्याला सारं काही मिळणार होतं. मात्र ते सारं झिडकारुन आपण निष्ठा जपली आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित रहा, असं आवाहन आमदार गडाख यांनी यावेळी बोलताना केलं.
मेळाव्याचं स्थानिक पत्रकारांना निमंत्रणच नाही?
या मेळाव्याला नगर आणि नेवाशाहून पत्रकार मोठ्या संख्येनं आले होते. प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचेदेखील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मात्र सोनई गावातल्या स्थानिक पत्रकारांना या मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलं नसल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. या संदर्भात अनेक स्थानिक पत्रकारांकडे विचारणा केली असता या मेळाव्याचं निमंत्रण आलं नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र वस्तुस्थिती नक्की काय आहे, स्थानिक पत्रकारांना का डावलण्यात आलं, याविषयी मात्र आमदार गडाखांची यंत्रणाच सांगू शकेल.