एफ आर पी प्रमाणं ऊस उत्पादकांना पेमेंट न देणाऱ्या आणि अनेक महिन्यांपासून कामगारांचे पगार न करणाऱ्या साखर कारखान्यांना यावर्षी गाळप करण्याचे परवाने देण्यात येऊ नयेत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीनं करण्यात आली आहे.
यासंदर्भात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रादेशिक सहसंचालक आणि जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना निवेदन दिलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. 14 ऑगस्ट रोजी साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील औताडे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
केंद्र शासनाचा एफआरपीचा जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार ऊस गाळपाला आल्यानंतर 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादकाला पेमेंट देणं बंधनकारक आहे. मात्र नगर जिल्ह्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी या नियमाचं पालन केलेलं नाही.
विशेष म्हणजे एफ आर पी थकीत असलेल्या कारखान्यांवर अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. अनेक कारखान्यांनी कामगारांचे पगारदेखील केलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटनेच्यावतीनं आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आल्याचं औताडे यांनी सांगितलंय.