बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
सन २०२३ मध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्या पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापही नवीन नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे तीन – चार दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी सोडा. अन्यथा दुय्यम दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखण्यात येईल, असा इशारा एका ग्रुप कॉलद्वारे दिला होता. मात्र तरीदेखील बदली करण्यात आलेले अनेक पोलीस कर्मचारी जुन्याच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घुटमळत आहेत.
दरम्यान, एसपी ओला यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध एस. पी. ओला हे कारवाई करणार का? अहिल्यानगर जिल्ह्यात हे नक्की चाललंय तरी काय? हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळाला खास आदेश दिले होते, की दरबारात अधिकृतपणे काम करणाऱ्या इसमाची दर तीन वर्षांनी बदली करण्यात यावी. सदर इसमाची संबंधित विभागात मक्तेदारी होऊ नये तसंच या इसमांकडून सामान्य जनतेवर अन्याय होऊ नये, हा छत्रपती शिवरायांचा यामागचा हेतू होता.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील भारताची राज्यघटना तयार करताना छत्रपती शिवरायांच्या या आदेशालाच आदर्श मानून राज्यघटना लिहिली. त्या घटनेनुसार आजदेखील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली केली जाते. मात्र अलीकडच्या काळात बदलीचे हे आदेश नुसतेच तोंडी आदेश किंवा कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे की काय, अशी शंका यायला लागली आहे.
अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असलेले एस. पी. ओला
यांच्या आदेशालाच जर हरताळ फासला जात असेल तर सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कशा पद्धतीने वर्तणूक केली जात असेल याची कल्पनाही तुम्ही आम्ही करु शकत नाही.
भिंगारचा स्थानिक पोलीस कर्मचारी आणि आदर्श आचारसंहिता…!
अहिल्यानगरजवळच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातला एक पोलीस कर्मचारी भिंगारच्या वाघस्करगल्लीचा स्थानिक रहिवासी असतानादेखील त्याला भिंगारच्या पोलीस ठाण्यातच नेमणुकीला ठेवण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याची अन्यत्र बदली का करण्यात आली नाही, हा मोठा गहन प्रश्न नगरच्या पोलीस दलात उपस्थित होत असून या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी किमान आदर्श आचारसंहितेचा तरी विचार करायला हवा, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा पोलीस कर्मचारी अमक्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचं सांगत राजकारण करत असल्याची चर्चा आहे. एसपी राकेश ओला या पोलीस कर्मचाऱ्याची आणि त्याच्या वरिष्ठांची कानउघाडणी करतील का, हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.