बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
सामान्य माणसाला मुलीचं लग्न, शेतजमिनीची खरेदी, व्यवसाय वाढीसाठी तातडीने पैशांची गरज भासते. अशावेळी राष्ट्रीयकृत बँका अजिबात सहकार्य करत नाहीत, हा अनेकांचा अनुभव आहे. पतसंस्थाचे व्याजदर तर विचारायलाच नकोत. अशा परिस्थितीत सामान्य माणूस सावकाराकडे जातो. मात्र राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थांपेक्षा भयानक स्वरुपाचा व्याजाचा धंदा करणाऱ्या या बेकायदा सावकारांमुळे अनेकांनी मरणाला कवटाळलं आहे. या बेकायदा सावकारांवर कोणाचं नियंत्रण आहे की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला
यांना जाहीररित्या आवाहन करावसं वाटतं, की अशा बेकायदा सावकारांची थोबाडं रंगवा. हे काम तुम्हीच करु शकता. कारण जिल्हा उपनिबंधक कार्यालय एक प्रकारे ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे. बेकायदा सावकारांची थोबाडं रंगवण्याची खरच वेळ आली आहे. कारण सामान्यांच्या मरणावर ही गिधाडं टपली आहेत. या बेकायदा सावकारांच्या व्याजाचा दर 30% च्या पुढे असतो. सामान्य माणूस बेकायदा सावकाराच्या दारात गेला तर तो एक प्रकारे मरणाच्याच दारात गेला, असं समजायला हरकत नाही.
या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवरचं उदाहरण अत्यंत बोलक आणि जळजळीत वास्तव आहे. या होस्टेलवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बेकायदा सावकार आणि गुंड प्रवृत्तीचा असलेला वैभव सुभाष चौधरी आणि त्याचा सहकारी साई मदने (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे व्याजाने घेतलेले पैसे देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
वैभव सुभाष चौधरी या बेकायदा सावकाराकडून काष्टीच्या इंजिनियर कॉलेजच्या होस्टेलवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या संदर्भात नेवासे तालुक्यातल्या खरवंडी इथं राहत असलेल्या सौरभ विजय सुरवसे यांनी दि. २४ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला आहे.
सौरभचा मित्र अथर्व दातीर याला १ लाख रुपयांची आवश्यकता होती. वैभव सुभाष चौधरी याच्याबरोबर सौरभ विजय सुरवसे याची ओळख होती. काही दिवसांनी वैभव सुभाष चौधरी हा इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर गेला आणि सौरभ सुरवसे, अथर्व दातीर आणि नितीन डोईफोडे यांना मारहाण करत डोक्याला गावठी कट्टा लावत पाच लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्या नाही तर तुम्हाला मारुन टाकतो, अशी धमकी चौधरीनं दिल्याचं पोलिसांना देण्यात आलेल्या या तक्रार अर्जात म्हटलं आहे.
वैभव चौधरी आणि सुभाष चौधरी या बाप – लेकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 47 गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही पोलिसांनी या दोघांना अटक केलेली नाही. या चौधरीला कोणाचा वरदहस्त आहे, या चौधरीकडे सावकारी करण्याचा परवाना आहे का, या प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव गेला किंवा एखाद्यानं फाशी घेतली तर त्याला जबाबदार कोण, याचा गंभीरपणे विचार करुन अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला यांनी चौधरी या बेकायदा सावकारासह त्याच्या साथीदारांपुरतं कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे.