बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
कुठलीही निवडणूक म्हटलं, की अंदाज व्यक्त करणं हे ओघानं आलंच. अर्थात हा अंदाज खरा ठरतो की खोटा ठरतो, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होतंच असतं. मात्र निवडणुकीचं एकूण चित्र कसं असणार आहे, कोणता उमेदवार आघाडीवर राहणार, कोणता उमेदवार पिछाडीवर राहणार, याचा गोशवारा जनमत चाचणीद्वारे घेतला जातो. ही जनमत चाचणी खरी किंवा खोटी, हा वेगळा मुद्दा असला तरी या अंदाजाप्रमाणंच सारं काही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करणं किंवा बाळगणं, हे शहाणपणाचं लक्षण नक्कीच नाही.
हल्लीचा जमाना हा सोशल मिडियाचा आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे जे अंदाज वेगवेगळ्या एजन्सीद्वारे व्यक्त केले जात आहेत, सोशल मिडियाच्या माध्यमातून ते सर्वत्र प्रसारित करण्याचं काम केलं जातं. सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा असाच एक अंदाज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. स्वतंत्र नेवासा 221 विधानसभा मतदारसंघातली संभाव्य परिस्थिती काय राहणार, याविषयीचा हा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या अंदाजाविषयी रोखठोक 24 न्युज नेटवर्क कुठलीही शाश्वती किंवा हमी देत नाही.
कुठल्या तरी लोकल पब्लिक सर्वे एजन्सीनं हा सर्वे केला आहे. अर्थात सर्वे करणाऱ्या एजन्सीचं नावच या ठिकाणी निष्पन्न होत नसल्यानं हा अंदाज ग्राह्य कसा धरायचा, हा एक चिंतनाचा विषय ठरेल. या अंदाजानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे
हे 100% टक्क्यांपैकी 41 टक्के मतं मिळविणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. विद्यमान आमदार शंकरराव गडाख
हे 39.5 टक्के मतं मिळविणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब मुरकुटे
यांना 18.5 टक्के मतं मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली ही जनमत चाचणी स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात संभ्रमाचं वातावरण तयार करणारी आहे. या जनमत चाचणीवर किती प्रमाणात विश्वास ठेवायचा, हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे. मात्र रोखठोक 24 न्युज नेटवर्क या जनमत चाचणीशी अजिबात सहमत नाही. मात्र सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या जनमत चाचणीविषयी तटस्थपणे बातमी देण्याचा आमचा हेतू आहे.