बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
‘अहो, मी तर अक्षरशः ‘पर्सनल लोन’ काढून मोठ्या विश्वासानं १२ लाख रुपये गुंतवले. पण ‘त्या’ गोडबोल्या भामट्यानं मला फसवलं हो. परतावा तर सोडा. मला माझी मुद्दलदेखील दिली नाही. मी आता काय करु’? मुलीच्या, बहिणीच्या लग्नासाठी पैसे ठेवले होते, ते सारेच पैसे आता बुडाले आहेत. लग्न तर तोंडावर आलं आहे. काय करावं, समजत नाही, ही अशी रडगाणी गाणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. शेवगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या आर्थिक घोटाळ्यात अनेकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. मात्र हे सारे ‘इन्व्हेस्टर्स’ सध्या कोणत्या बिळात लपले आहेत, हेच कळायला कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. या गुंतवणूकदारांना आमचा जाहीर सवाल आहे, की तुम्ही ‘नकटे’, ‘मिंधे’ आहात का? अरे, तुमचे कोट्यवधी रुपये अडकले तरी तुमची दातखिळ का बसलीय?
तिकडं कर्नाटकच्या हेब्बागोडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी तिथल्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यासंदर्भात पोलिसांना निवेदनदेखील देण्यात आलं. मात्र त्यावर पुढं काहीच झालं नाही.
स्वतःचे लाखो रुपये अडकले असतानादेखील गुंतवणूकदार जर गप्प बसण्याची भूमिका घेत असतील, पोलिसांकडे कुठलाही पाठपुरावा करत नसतील तर या गुंतवणूकदारांचा जो पैसा शेअर मार्केटमध्ये अडकला आहे, तो खरोखरच कष्टाचा होता की त्यांना अचानक झालेला ‘धन’लाभ होता, याचे उत्तर मात्र या गुंतवणूकदारांनाच माहित आहे.
आर्थिक फसवणुकीसंदर्भात नुसतीच पोलिसांकडे तक्रार करुन किंवा निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी गुंतवणूकदारांचा तपास यंत्रणेवर योग्य तो दबाव आवश्यक असतो. ज्यांचा कष्टाचा पैसा बुडाला आहे, ते नक्कीच स्वस्त बसत नाहीत. सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा करणं, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणं, पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घालणं अशा सनदशीर मार्गानं हक्काच्या आणि कष्टाच्या पैशांसाठी सुरुवातीला अनेक ठेवीदार पाठपुरावा करतात. पण नंतर मात्र त्यांचा धीर तुटतो आणि याचाच गैरफायदा शेअर मार्केटचे भामटे दलाल घेत आहेत.
… तर जागतिक मंदीच्या नावानं बोंबा का मारताय?
एखाद्या गरजवंतानं दुसऱ्या आर्थिकदृष्ट्या ‘मजबूत’ असलेल्या ओळखीच्या माणसाला आर्थिक मदत मागितली किंवा हातउसने पैसे मागितले तर ‘सध्या मी पण खूप आर्थिक अडचणीत आहे’. ‘आत्ताच एकाला हात उसने दिले. तू लवकर आला असता तर काम झालं असतं’. ‘सध्या जागतिक मंदी आहे. सर्वांनाच आर्थिक चणचण भासत आहे’, अशा अवजड शब्दांचा वापर करत खोटी खोटी सहानुभूती दाखवली जाते. अर्थात ही ‘नाटकं’ गरजवंताच्या लगेचच लक्षात येतात. पण काही इलाज नसतो. एकीकडे जागतिक मंदीच्या नावाने बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे मात्र कोट्यवधी रुपयांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची. अशा परिस्थितीत जागतिक मंदीच्या नावानं बोंबा का मारल्या जाताहेत, हा खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो.
पोलीस तरी कशाला ‘…वती गाढवं’ बोकांडी घेतील?
आपल्याकडे एक भन्नाट अशी म्हण आहे. ती जशीच्या तशी इथं देणं, हा सुसंस्कृतपणा ठरणार नाही. त्यासाठी त्या म्हणीमध्ये थोडासा बदल करुन ती आमच्या हक्काच्या वाचकांसाठी देत आहोत. ती म्हण अशी आहे, ‘दुभती गाय सोडून …वतं गाढव बोकांडी घेणं’. शेअर मार्केटमध्ये ज्यांची आर्थिक फसवणूक झाली, तेच आता थोबाडं लपवित आहेत. कारण काय, तर म्हणे, एवढा पैसा कुठून आला, असं विचारलं तर काय सांगणार? जर एवढी मोठी चिंता होती तर मग शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करताना संबंधितांनी स्वतःची अक्कल कुठं गहाण ठेवली होती? जर ठेवीदारच संशयाच्या भोवऱ्यात असले तर पोलीस तरी कशाला ‘…वती गाढव’ बोकांडी घेतील, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
अक्कल गहाण ठेवा आणि असंच देशाला दारिद्र्यात ढकलून द्या…!
अनेक राष्ट्रीयकृत बँकांना ‘चुना’ लावत विजय मल्ल्या पळून गेला, सरकारनं त्याची काय उपटली? निरव मोदी पळाला, काय केलं सरकारनं? हर्षद मेहतानं मोठा आर्थिक घोटाळा केला होता. काय वाकडं केलं कोणी त्याचं? शेवगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या माध्यमातून करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा करणाऱ्यांचं तरी कोण काय वाकडं करणार आहे? मल्टीस्टेट क्रेडिट सोसायट्या
आणि मल्टीसिटी निधी फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांनी सर्वसामान्यांच्या खिशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला. त्यांचं तरी कुठे वाट्टोळं झालं? तर मग आता गुंतवणूकदारांनो, यापुढे तुम्ही खुशाल तुमची अक्कल कुठं तरी गहाण ठेवा, शेअर मार्केटच्या लबाड दलालांकडे आणि मल्टीस्टेट क्रेडिट सोसायट्यांसह मल्टीसिटी निधी फायनान्स कंपन्यांच्या
स्वार्थी, हलकट अध्यक्षांकडे लाखो, करोडो रुपये गुंतवा आणि असंच देशाला आर्थिक दारिद्र्यात ढकलून द्या, एवढाच निर्वाणीचा सल्ला देत आहोत. धन्यवाद.