दळवी आणि ढाकणे ही खरं तर कोतवाली पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या ‘त्या’ दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आडनावं आहेत. हे दोन कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून एकदाही साप्ताहिक सुट्टी न घेता केडगाव बायपासवर ‘विशेष प्रकारची सेवा’ देत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावणाऱ्या ड्युटी अंमलदाराचा या दोघांवरच प्रचंड ‘कृपावर्षाव’ होत आहे.
विशेष म्हणजे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा आदेश डावलून हे दोघेजण आलटून पालटून केडगाव बायपासवर ‘विशेष प्रकारची सेवा’ देत आहेत. या सेवेबद्दल या दोघांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करायला हवा, अशी गंमतीशीर अपेक्षा पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
नगर शहरातलं सर्वात ‘हेवी’ पोलीस स्टेशन म्हणून कोतवाली पोलीस ठाणे प्रसिद्ध आहे. या पोलीस ठाण्याची ‘स्ट्रेंथ’ मोठी आहे. या पोलीस ठाण्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ‘ड्युटी’ दिली जाते. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना डावलून दळवी आणि ढाकणे या दोघांवरच ड्युटी अंमलदाराची एवढी ‘खप्पा मर्जी’ का आहे, याची पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी झाडाझडती घेण्याची गरज आहे.
मुळात प्रश्न हा आहे, की कोतवाली पोलीस ठाण्यात जनरल ड्युटी करणारे अजून अनेक पोलीस कर्मचारी आहेत. मात्र या दोघांचाच केडगाव बायपास परिसरात ड्युटी करण्याचा एकमेव हक्क आहे का आणि यासाठी या दोघांनी ताम्रपत्र आणलंय का? खरं तर
या दोघांची नाशिकच्या आयजींनी सखोल चौकशी करुन अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील केडगाव बायपासवर ‘विशेष प्रकारची सेवा’ करण्याचं ‘पुण्य’ मिळावं, अशी माफक अपेक्षा यानिमित्तानं केली जात आहे.
दरम्यान, केडगाव बायपासवर सलग तीन वर्षे म्हणजे साप्ताहिक सुटी न ‘विशेष प्रकारची सेवा’ देणाऱ्या दळवी आणि ढाकणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत जमा केलेल्या अपसंपदेची खरं तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत (अँटी करप्शन ब्युरो) कसून चौकशी करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची बातमी अशी आहे, की प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर दळवी या पोलीस कर्मचाऱ्याची नुकतीच शहर वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाल्याचं बोललं जातंय. या अनुभवाच्या जोरावर दळवी हे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कशाप्रकारे कामगिरी करतात, स्वतःच्या कामाचा ठसा कशा पद्धतीने उमटवितात आणि तिथं कोणकोणते ‘चमत्कार’ करतात, याची ‘ट्रॅफिक’लादेखील उत्सुकता आहे.