बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रवेश पथकर नाक्यामध्ये (एन्ट्री टोल टॅक्स) गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रचंड आर्थिक घोटाळा झाला आहे. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे टोलनाके चालविण्यासाठी संबंधितांनी तब्बल 4 कोटी 65 लाख रुपयांची बोगस बँक गॅरंटी दिल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेला आहे. खरं तर हा अतिशय गंभीर घोटाळा आहे. पण या प्रकरणी संबंधितांना कुठलंही शासन झालेलं नाही. त्यामुळे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांना या बातमीच्या माध्यमातून जाहीर आवाहन करावसं वाटतं, की अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 4 कोटी 65 लाखांच्या बोगस बँक गॅरंटीकडे जरा पहा. लोकसभा निवडणुकीत ज्या भिंगारकरांनी तुम्हाला प्रचंड मताधिक्य दिलंय, त्या भोळ्याभाबड्या भिंगारकरांवर माणुसकीच्या दृष्टिकोनातून जरा दया दाखवा.
वास्तविक पाहता ही बोगस बँक गॅरंटी तपासून पाहण्याची जबाबदारी खरं तर अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात रेव्हेन्यूचा (महसूल विभाग) टेबल सांभाळणाऱ्या बुटक्या आणि टकल्या अधिकाऱ्यासह अकाउंटंटपदाची जबाबदारी असलेल्या ‘मिंधे साहेब’ अशी ओळख असलेल्या अशा या दोघांचीच आहे. पण या प्रकरणात बुटका आणि टकला अधिकारीच अप्रत्यक्ष भागीदार असल्यानं ही बँक गॅरंटी तपासण्याची गरज नसल्याचं त्यानं सांगितलं. अकाउंटंट असलेला ‘मिंधे साहेब’ हा तर मोठाच धाडसी अधिकारी. कारण प्रत्येक कामांच्या चेकवर एक टक्का कमिशन घेतल्याशिवाय तो सहीच करत नाही, हे जळजळीत वास्तव आहे. सीबीआय मार्फत या दोघांची चौकशी झाली तर सर्वकाही सत्य उजेडात येऊ शकते.
अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रवेश पथकर नाक्याचा ठेका चालविणाऱ्या ‘महाठकां’नी भिंगारच्याच एका बँकेबरोबर प्रचंड विश्वासघात केलाय. खऱ्या अर्थानं अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या दोन अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेकडे खातरजमा करायला हवी होती. मात्र मोठा ‘मलिदा’ लाटण्याच्या नादात या दोघांनी भिंगारकरांची विष्ठा खाण्याचंच दुष्कर्म केलंय. खासदार लंके यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातल्यास मोठ्या आर्थिक घोटाळ्याची पाळंमुळं नक्कीच भिंगारच्या जनतेसमोर येतील.
खासदार लंके साहेब! हिंमत दाखवा आणि अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर उपोषण कराच…!
अवैध धंदे आणि पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध उपोषण करून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष अहमदनगरकडे वेधून घेण्याची किमया खासदार निलेश लंके यांनी करुन दाखवली आहे. त्यांच्या या उपोषणाची चर्चा राज्यभर झाली. आता त्याच पद्धतीनं खासदार लंके यांनी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डातल्या या भ्रष्टाचाराचा भस्मासूर जमिनीत खोल गाडून टाकण्यासाठी हिंमत दाखवावी आणि अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करून दाखवावंचं, अशी अपेक्षा भिंगारचे लाखो मतदार खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.