अहिल्यानगरखासदार निलेश लंके साहेब! लोकांच्या घरात शिरलेलं पाणी नुसतं पाहू नका ;...

खासदार निलेश लंके साहेब! लोकांच्या घरात शिरलेलं पाणी नुसतं पाहू नका ; या परिस्थितीला जबाबदार असलेल्या नगर महापालिका प्रशासनाला खडसावून जाब विचारा…!

Published on

spot_img

यंदाच्या पावसाचं पाणी गुलमोहर रोड, नरहरीनगर परिसरातल्या नागरिकांच्या घरात शिरलं. त्यामुळे त्या भागातल्या नागरिकाची चांगलीच तारांबळ उडाली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी या भागाला भेट दिली. अर्थात या भेटीच्यावेळी कॅमेऱ्याचा लवाजमा खासदार लंके यांच्यासोबत होताच. सोबतीला नगरसेवक योगीराज गाडेसुद्धा होते. न्युज अलर्ट मराठी या वृत्तवाहिनीच्या व्हिडिओची लिंक मुद्दाम आम्ही रोखठोक 24 न्युज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी या बातमीच्या मथळ्यातच देत आहोत.

अशी विदारक अवस्था या ऐतिहासिक नगर शहर आणि परिसराची का झाली, कोणामुळे झाली, याला नक्की कोणाचं धोरण जबाबदार आहे, कोणाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात सोबतच नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांना आम्ही सुचवू इच्छितो, की लोकांच्या घरात शिरलेलं पाणी नुसतं पाहू नका. अशा परिस्थितीला जबाबदार असलेल्या नगर महापालिका प्रशासनाला आणि नगररचना विभागाला याबद्दल खडसावून जाब विचारा.

नगर शहरातले 84 वर्षीय ‘अँग्री यंग मॅन’, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगिडे यांनी नगर महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तब्बल 41 ओढे आणि नाले गायब झाल्याचा गंभीर आरोप लोकायुक्तांकडे करण्यात आलेल्या पत्राद्वारे केला आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत. त्यांनासुद्धा चंगेडे यांनी फैलावर घेतलं आहे.

नगर शहर आणि परिसरातले 41 ओढे आणि नाले भुईसपाट करण्यात येऊन त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. याचा परिणाम असा झाला, की सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. हे लेआउट कोणी बदलले, ओढे नाले भुईसपाट कोणी केले, याचा शोध घेऊन चुकीचा लेआउट करणाऱ्या नगर रचना विभागाला खरं तर खासदार लंके यांनी फैलावर घेण्याचीच गरज आहे.

हा विषय आत्ताचा मुळीच नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा गंभीर विषय आहे. जोपर्यंत या गंभीर विषयाच्या मुळापर्यंत खासदार लंके आणि महापालिका प्रशासन जाणार नाही, तोपर्यंत भविष्यात अशा समस्या भेडसावतच राहणार आहेत. त्यामुळे खासदार लंके यांनी महापालिका प्रशासनाची एकदा झाडाझडती घ्यायलाच हवी, अशी माफक अपेक्षा ऐतिहासिक नगर शहरातले नागरिक व्यक्त करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या