अहिल्यानगरछत्रपती संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा शेअर मार्केट घोटाळा ; घोटाळ्याचं 'कनेक्शन' नेवासे तालुक्यातल्या सोनईत......

छत्रपती संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा शेअर मार्केट घोटाळा ; घोटाळ्याचं ‘कनेक्शन’ नेवासे तालुक्यातल्या सोनईत… ! दरंदलेगल्लीतल्या एका वायरमनचा मुलगा या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा जो घोटाळा उघडकीस आला, त्या शेअर मार्केट घोटाळ्याची चर्चा थांबत नाही, तोच छत्रपती संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा शेअर मार्केट घोटाळा झाल्याची बातमी येऊन धडकलीय. या घोटाळ्याचं ‘कनेक्शन’ नेवासे तालुक्यातल्या सोनईत असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. सोनईतल्या दरंदलेगल्लीत राहत असलेल्या एका वायरमनचा मुलगा या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ असल्याचं बोललं जातंय.

या ‘मास्टरमाईंड’नं छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भाडोत्री फ्लॅटमध्ये शेअर मार्केटचं प्रशस्त कार्यालय थाटलं होतं. यापूर्वी तो एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीला होता. या तरुणानं शेअर मार्केटमध्ये चांगला जम बसवला होता. पण म्हणतात ना, अल्पावधीत आणि कमी कष्टांत हाती आलेला बक्कळ पैसा माणसाला एक तर माणसांत बसवतो किंवा माणसांतून उठवतो.

अचानक प्रचंड पैसा पाहिलेल्या या ‘मास्टरमाईंड’ची नियत बदलली आणि कोट्यवधी रुपये घेऊन कार्यालयाला कुलूप लावत स्वतःचा आयफोन बंद करुन हा ‘मास्टरमाईंड’ गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ झाला आहे.

या ‘मास्टरमाईंड’ची कौटुंबिक पार्श्वभूमी…!

छत्रपती संभाजीनगरच्या शेअर मार्केटच्या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ असलेल्या या तरुणाचे वडील वायरमन आहेत. या ‘मास्टरमाईंड’च्या वडिलांना स्वमालकीची जमीन नसून ते घरगुती लाईट फिटिंगचं काम करत आहेत. एक मुलगा म्हणजे या मास्टरमाईंड’चा एक भाऊ कारखान्यात नोकरीला आहे.या मास्टरमाईंड’च्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कमी कष्टांत जास्तीत जास्त पैसा कमविण्याच्या नादात या मास्टरमाईंड’नं त्याच्या बापाच्या डोक्याला मोठा घोर लावून ठेवलाय.

गुंतवणूकदार पोलीस तक्रार करण्याच्या मानसिकतेत…!

या मास्टरमाईंड’कडे अनेकांनी लाखो नव्हे करोडो रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. शेअर मार्केट जुगार नसून बुध्दीच्या जोरावर केला जाणार व्यवसाय असून यात सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही. कारण गुंतवणूकदारांचं आर्थिक हित पहाणं हाच आमचा ‘अजेंडा’ आहे, अशा पध्दतीनं गोड गोड बोलून गुंतवणूकदारांचा अनेकांचा विश्वास संपादन करत या ‘मास्टरमाईंड’नं अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. अनेक गुंतवणूकदारांचा यामध्ये कष्टाचा पैसा असून हे सर्व गुंतवणूकदार आता या ‘मास्टरमाईंड’विरुध्द सोनई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्याच्या मानसिकतेत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या