रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात शेतकऱ्यांचा कोणीच वाली राहिलेला नाही, हे जळजळीत वास्तव आहे. केंद्र आणि राज्य सरकारलासुद्धा याकडे पाहिला वेळ मिळत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. नेवासे तालुक्यातल्या खरवंडी शिवारात एका शेतकऱ्याला जमीन आहे. पण जमिनीकडे जायला रस्ताच नाही. त्यामुळे कचरु केशव भोगे या शेतकऱ्यानं योगेश दीनानाथ तिवारी यांच्यासह दि. 19 सप्टेंबरपासून शेताच्या बांधावरच आमरण उपोषण सुरु केलं आहे.
यासंदर्भात नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनादेखील निवेदन देण्यात आलं आहे. मात्र या गंभीर समस्येकडे पाहायला त्यांना खरंच वेळ मिळेल का, हाच खरा प्रश्न आहे.
विशेष म्हणजे कचरु भोगे यांच्या बाजूने संबंधित रस्त्याचा निकाल पारित झालेला असूनही रस्ता देण्याऐवजी भोगे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचं सदर निवेदनात म्हटलं आहे. ज्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे, त्यांच्या मालकीच्या सद्गुरु मंगल कार्यालयातलं सांडपाणी रस्त्यावरच सोडण्यात आलं आहे. परिणामी भोगे कुटुंबियाला आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी भोगे यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, नगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, शेवगावचे पोलीस उपअधीक्षक, नेवासाचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत.