बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र नेवासा मतदारसंघातून नक्की कोण उमेदवार रिंगणात राहणार आहेत, हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार की शिंदे गटाच्या शिवसेनेला, संभाव्य उमेदवार ऋषिकेश शेटे पाटील राहणार की प्रभाकर काका शिंदे, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला अवघ्या काही तासांचाच अवधी राहिलेला आहे. मात्र स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेला गेला तर प्रभाकर काका शिंदे हे ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. या निवडणुकीत ते भल्याभल्यांना घाम फोडणार आहेत. पण ‘कमळ’ की ‘धनुष्यबाण’च्या निर्णयानंतरच हे स्पष्ट होणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेचा असला तरी हा मतदारसंघ भाजपला देण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र कणकवली विधानसभा मतदारसंघ जर भाजपला गेला तर भाजपचा हक्काचा असलेला स्वतंत्र नेवासा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात येणार आहे, अशा चर्चा आता ऐकायला येत आहेत. असं झाल्यास शिंदे गटाच्या शिवसेनेकडून प्रभाकर काका शिंदे धनुष्यबाण हातात घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडणार आहेत. अर्थात हे अजून स्पष्ट व्हायचं आहे.
प्रभाकर काका शिंदे हे नाव नेवाशासह संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पंचगंगा सीड्सच्या माध्यमातून प्रभाकर काका शिंदे यांची महाराष्ट्राच्या बाहेरदेखील मोठी ओळख आहे. व्यवहार चातुर्य, हसतमुख चेहरा आणि संघटन कौशल्य या सदगुणांच्या पाठबळावर प्रभाकर शिंदे काका या विधानसभेच्या निवडणुकीत सहजासहजी बाजी मारु शकतात, असं नेवासकरांमधून बोललं जात आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या पावन पदस्पर्शानं पुनित झालेला नेवासा तालूका भविष्यकाळात प्रचंड मोठी भरारी घेऊ शकतो, असा नेवासकरांना आत्मविश्वास आहे. प्रभाकर काका शिंदे प्रस्थापितांसह सर्वच संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर मोठं कडवं आव्हान उभं करु शकतात, अशीदेखील शक्यता या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.
‘बुलडोझर बाबा’ची सोनईत होणार जाहीर सभा…!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (बुलडोजर बाबा)
यांच्या महाराष्ट्रात तब्बल 45 प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा होणार आहे. यातून हिंदुत्ववादी विचारांचं प्रचंड असं मंथन होणार आहे. नेवासे तालुक्यातल्या सोनईत मुद्दामहून योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे.