अहिल्यानगरतुमचं अनमोल मत 'गेम चेंजर' ठरणार आहे...! मतदान करायला विसरु नका...! पण...

तुमचं अनमोल मत ‘गेम चेंजर’ ठरणार आहे…! मतदान करायला विसरु नका…! पण कोणाला करायचं मतदान, हेदेखील नक्कीच घ्या जाणून…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

माझ्या एका मतानं काय होणार आहे? मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय फरक पडणार आहे? असा बेजबाबदारपणाचा विचार करत अनेक ‘रिच क्लास’वाले निर्लज्जपणे मतदानाच्या दिवशी ‘हवा पालट’ करायला बाहेरगावी जाण्याचा ‘प्लॅन’ आखतात. मतदान करण्यासाठी मात्र सामान्य गरीब जनता दिवसभर रांगेत उभी राहते. याच सामान्य जनतेला आम्हाला सांगायचंय, की तुमचं अनमोल मत ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. मतदान करायला विसरु नका. मतदानाचा हक्क नक्की बजवाच.

आपल्या देशातला मध्यमवर्गीय माणूस हा देशासाठी जास्तीत जास्त त्याग करत असतो. आपल्या उत्पन्नातला बराचसा भाग टॅक्स म्हणून तो भरत असतो. मात्र दुसरीकडे गरीब माणूस पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. टॅक्स भरणाऱ्यांना तुम्ही कधी मतदान करताना मतदारांच्या रांगेत पाहिलं आहे का? अर्थात सगळेच असे नाहीत. अनेक जण याला अपवाद आहेत. येत्या २० तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा अधिकार हा बजवायलाच हवाय.

आता मतदान नक्की कोणाला करायचं, या प्रश्नाचं उत्तरदेखील जाणून घ्या. आपल्याकडे गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे कोण कोणाला मतदान करणार, हे गुप्त ठेवलं जातं. असं असलं तरी आपण मतदान कोणाला करायचं, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर ते एका वाक्यात देता येणार नाही. कोणत्या एका राजकीय पक्षाला मत द्या, किंवा अमूक एका राजकीय पक्षाला मत देऊ नका, असं आम्ही मुळीच सांगणार नाही.

देव, देश आणि धर्म यासाठी जो प्रथम प्रधान्य देतो, धर्माचा राष्ट्राचा आणि साधुसंतांचा जो सतत सन्मान करतो, साधू संतांच्या आणि युगपुरुषांच्या विचारसरणीनुसार वागण्याचा प्रयत्न करतो, आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या घटकांसाठी काही तरी करायची ज्याची इच्छा आहे, जो भ्रष्टाचाराच्याविरुद्ध आहे, अशा उमेदवाराला तुमची सेवा करण्यासाठी मतदानाच्या रुपानं अवश्य संधी द्या.

जो देवाच्या हिश्श्यायाचंही स्वतःसाठी वापरतो, सत्ताधारी झाल्यानंतर विधायक कामांऐवजी विरोधातल्या लोकांना जो सत्तेचा माज दाखवतो, भावनिकतेचा आश्रय घेतो, मतलब साधला, की त्याच्यासाठी पळणाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देतो, संकटात कोणाच्याच मदतीला धावून जात नाही, सतत ‘संधीसाधू’ राजकारण करत असतो, विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना चुकीच्या कामांबद्दल कधीच जाब विचारत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला अजिबात मतदान करु नका. कारण तुमच्या बहुमुल्य मताचा तो घोर अपमान होईल.

… तर मग कशाला हवीय ‘ती’ शपथ?

गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होते. इच्छुक उमेदवार निवडून येतात. सरकार स्थापन केलं जातं. हे करत असताना सत्ताधारी मंत्री आणि सर्वच आमदारांना पद आणि गोपनीतेची शपथ दिली जाते. ‘मी या पदाचा दुरुपयोग करणार नाही. कोणाशीही आकसबुद्धीने वागणार नाही. सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील’, अशा प्रकारची शपथ सत्ताधारी मंत्री आमदार घेत असतात. मात्र या शपथेनुसार ते पाच वर्षे खरंच वागतात का? वास्तविक पाहता या शपथेच्या विरुद्ध ते वागत असतात. विरोधकांना सत्तेचा माज दाखवत असतात. असं जर होणार असेल तर मग कशाला हवी ती शपथ? त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सूज्ञ मतदारांनो, नक्कीच विचार करा आणि योग्य उमेदवारालाच सेवेची संधी देण्याचा निर्णय घ्या.

आणखी महत्वाच्या बातम्या