एसटी बसमध्ये खिडकीजवळ जागा मिळावी, यासाठी प्रवाशांमध्ये प्रचंड भांडणं होत असल्याचे किस्से तुम्हाला माहित आहेतच. मात्र आता चक्क विमानात या कारणावरुन प्रचंड भांडणं झाली आहेत. विशेष म्हणजे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या विमाननगर परिसरात शनिवारी (दि. १७) सकाळी पावणेआठ वाजता हा किस्सा घडलाय.
अवंतिका बोरसे आणि आदित्य बोरसे हे विमानाने प्रवास करत होते. सुरेखासिंग नावाच्या महिलेचं बोरसे यांच्याशी बसण्याच्या जागेवरुन भांडण झालं. या महिलेने बोरसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे समजताच प्रियंका रेड्डी आणि सोनिका पाल यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेखासिंग या महिलेनं प्रियंका यांच्या हाताला चावा घेतला.
याप्रकरणी सीआयएसएफ पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका रेड्डी यांनी विमानतळ पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरुन सुरेखासिंग या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेवरुन एसटी प्रवाशांची मानसिकता आणि विमान प्रवाशांची मानसिकता यामध्ये काहीच फरक नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. विमानातून प्रवास करणारे प्रवासी बुद्धीजीवी असतात, असा एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समज होता. मात्र तो समज या घटनेवरुन काहीसा चुकीचा ठरत असल्याचं दिसून येत आहे.