नगरच्या महापालिकेत आयुक्त किंवा प्रशासक बदलल्यानंतर तरी किमान कामकाजामध्ये सुधारणा होतील, अशी अपेक्षा नगरकरांना होती. मात्र नगरकरांच्या या आशा- आकांक्षांवर पूर्णत: गाढवांचा नांगर फिरविण्यात आला आहे. या महापालिकेत आजही ‘आंधळंच दळतंय अन् कुत्रंच पीठ खातंय’. आकृतिबंधानुसार नगरच्या या महापालिकेत सर्व अधिकाऱ्यांची पदं भरलेली असतानादेखील एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार कशासाठी देण्यात आला असावा, अशी शंका नगरकरांमधून उपस्थित केली जात आहे.
या महापालिकेच्या घनकचरा विभागातलं स्वच्छ सर्वेक्षण, वाहन खरेदी, कचरा डेपो, घनकचऱ्याशी निगडित टेंडर, कचरा डेपो, कचरा डेपोशी निगडित असलेले तीन ते चार प्रकल्प, एफ एस टी पी, झोन क्रमांक चार व दोनचा प्रभारी मुख्य स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार. हे सारे पदभार एकाच अधिकाऱ्याकडे ठेवण्याचं नक्की कारण काय?
परिणामी नगर शहर आणि उपनगरात कचऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं निदर्शनात येत आहे. एफएसटीपीची दुरुस्ती, त्यातले प्रकल्प या सर्वच बाबी वादग्रस्त असून वर्तमानपत्रांत वारंवार याबाबत बातम्या प्रकाशित होत असतात. घनकचरा विभागात आवश्यकतेनुसार सर्व पदांवर अधिकारी उपलब्ध असतानादेखील संबंधित अधिकाऱ्याकडे पाच पाच ठिकाणचा पदभार देण्यामागं प्रशासनाचा उद्देश निश्चित स्वच्छ दिसत नाही.
महापालिका आवारात कानोसा घेतला असता या महापालिकेचे ‘सुप्रिमो’ आणि काही निवडक लोकांचा या अधिकाऱ्यावर वरदहस्त असल्याचं समजलं. नगरकरांच्या संकलित करांच्या (लोकल टॅक्स) माध्यमातून गोळा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात चुराडा होत आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे, अशी अपेक्षा नगरकरांमधून व्यक्त केली जात आहे.