अहिल्यानगरनगरच्या महापालिकेत जैविक कचरा संकलनासाठी 18 वर्षांपासून एकच ठेकेदार ; कोणत्या...

नगरच्या महापालिकेत जैविक कचरा संकलनासाठी 18 वर्षांपासून एकच ठेकेदार ; कोणत्या ‘बकासुरा’ची आहे त्यात ‘स्लिपिंग पार्टरनरशीप’? खासदार निलेश लंके आणि आयुक्त यशवंत डांगे झाडाझडती घ्याल का?

Published on

spot_img

नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात असलेल्या खर्डा या गावापासून ते या जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या अकोले तालुक्यापर्यंत जितके काही हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये जमा होणारा जैविक कचरा संकलन करण्यासाठी नगरच्या महापालिकेत तब्बल 18 वर्षांपासून एकच ठेकेदार आहे. या नगर जिल्ह्यातल्या खासगी दवाखान्यांसह रक्त, लघवी तपासणी करणाऱ्या लॅबोरेटरीजमध्ये जमा होणारा जैविक कचरा संकलित करण्याचं कामसुद्धा याच ठेकेदाराकडे आहे.

नगर जिल्ह्यातल्या सर्वच खासगी रुग्णालयांतल्या खाटांप्रमाणे जैविक कचरा संकलित करण्याचा हिशोब केला जातो. यातून संबंधित ठेकेदाराकडे या खासगी रुग्णालयांकडून जी काही ठराविक रक्कम जमा होईल, त्या संपूर्ण रक्कमेवर 15 टक्के रॉयल्टी नगरच्या महापालिकेला देण्याचं या ठेकेदारावर बंधन आहे. हा ठेका देताना प्रचंड अशा जाचक अटी आणि शर्ती महापालिका अधिनियमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थात त्या सर्व प्रश्नांची उत्तर नगरकरांना मिळतील का हाच मुख्य प्रश्न आहे. असो, ते प्रश्न असे आहेत, या सर्व संकलित होणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगर शहरातल्या बुरुडगाव परिसरात योग्य ती व्यवस्था आहे का? नगर जिल्ह्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांतला जैविक कचरा बुरुडगाव डेपो परिसरात दररोज जमा केला जातो का? नगरच्या महापालिकेत जैविक कचरा संकलनासाठी 18 वर्षांपासून एकच ठेकेदार का आहे? यासाठी दुसरा ठेकेदार मिळतच नाही का? यासाठी दुसरा कोणी लायकच नाही का? कोणत्या ‘बकासुरा’ची यात ‘स्लिपिंग पार्टरनरशीप’ आहे? खासदार निलेश लंके आणि आयुक्त यशवंत डांगे जरा झाडाझडती घेतील का?

एखादी मांजर ज्यावेळी डोळे बंद करुन ज्यावेळी दूध पित असते, त्यावेळी तिला असं वाटतं, की आपल्याला कोणीच पाहत नाही. मात्र त्या मांजरीचा हा निव्वळ भ्रम असतो. तसाच प्रकार नगरच्या महापालिकेत सुरु आहे.

जैविक कचरा संकलित करणाऱ्या ठेकेदाराशी ‘स्लिपिंग पार्टनरशीप’ करणाऱ्या
एका ‘बकासुरा’चीदेखील अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे. खरं तर नगरकरांना कोणत्या विभागात किती आणि कसा भ्रष्टाचार सुरु आहे, त्यामध्ये कोणाकोणाची हात बरबटलेले आहेत, याची सर्व कल्पना आहे. मात्र सहनशील नगरकर जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत सुरळीत सुरु राहील. मात्र नगरकरांच्या भावनेचा एकदा का कडेलोट झाला तर हा ज्वालामुखी कधी तरी नक्कीच उग्रावतार करील, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची सध्या तरी गरज नाही.

नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मध्यंतरी केलेल्या आमरण उपोषणानंतर नगरच्या पोलीस खात्याला खडबडून जाग आली आणि खासदार लंके यांनी आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांनी तातडीनं बदल्या केल्या. एक प्रकारे नगर जिल्ह्यात ‘लंके पॅटर्न’चा उदय झाला. कारण या आंदोलनाचा भरीव स्वरुपाचा परिणाम झाला. त्यामुळे खासदार लंके यांनी महापालिकेतल्या या घोटाळ्याची ही गंभीर बाब डोक्यात ठेवून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आयुक्त डांगे यांच्या ‘चमकोगिरी’मुळे शहरातले डास पळतील?

सध्या पावसाळा सुरु आहे. नगर शहर आणि परिसरातल्या खड्ड्यांभोवती डासांची उत्पत्ती वाढते आहे. परिणामी रोगराई वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त यशवंत डांगे सहकाऱ्यांसह शहरात फिरुन जनजागृती करत असले तरी नगरकरांच्या दृष्टीने ही एक प्रकारची ‘चमकोगिरी’ आहे. कारण या जनजागृतीऐवजी नगर शहर आणि परिसरात सध्या कुठं धूर फवारणी सुरु आहे? नगरच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये जे दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे, तिथं डास वाढताहेत. डासांच्या या वाढत्या उत्पत्तीवर तिथं काय ठोस उपाययोजना केली ? किंबहुना ती करण्याऐवजी आयुक्त डांगे यांच्या या ‘चमकोगिरी’मुळे डास पळणार आहेत का, हाच खरा प्रश्न आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या