बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
नगर आरटीओचा एजंटांनी बरबटलेला कारभार राज्यात सर्वश्रृत आहे. मात्र या सर्व एजंटांना ‘मॅनेज’ करणारा, पाकीटं वाटणारा, इथल्या भ्रष्टाचाराचा ‘पोशिंदा’, सारं काही आलबेल असल्याच्या अविर्भावात असलेला रुद्रवंशी कधीही नगर आरटीओला अडचणीत आणू शकतो. या कार्यालयाचा नुकत्याच महिन्याभरापूर्वी पदभार घेतलेले सगरे साहेब, तुमच्या अवतीभवती फिरणाऱ्या या रुद्रवंशीपासून जरा सावधान रहा. अन्यथा
‘हम तो डुबेंगे सनम मगर तुम्हें लेकर डुबेंगे’, हे खरं होईल. तुम्हाला भीती दाखवायचा आमचा मुळीच उद्देश नाही. पण हे असंच सुरु राहिलं, तर तुमच्या कार्यालयात अँटी करप्शन विभागाची धाड कधीही पडू शकते.
या बातमीच्या माध्यमातून नगरच्या अँटी करप्शन विभागाला आमचं आव्हान आहे, तक्रारदाराची वाट न पाहता तुम्हीच तक्रारदार व्हा आणि या रुद्रवंशीचे सर्व सीडीआर चेक करा. त्याने जमलेल्या अपसंपदेची चौकशी करा. असं केलं तर नगर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सुरु असलेल्या गैरव्यवहार तुमच्या नक्की लक्षात येईल.
नगर आरटीओच्या कार्यालयात प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिका देण्यात आलेली आहे. या रुद्रवंशीलादेखील एक महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. या कार्यालयातल्या सर्व ‘गडबडी’ मॅनेज करणं, एजंटांकडून वसुली करणं, उपद्रवमूल्यं वाढल्यास पाकीटं देऊन संबंधितांचा आत्मा शांत करणं ही आणि अशी बरीच कामं रुद्रवंशी इमाने इतबारे करत आहे. याला जर आवर घातला नाही तर नगर आरटीओचे भविष्य फार अंध:कारमय आहे, असं म्हटल्यास ती अतिशयोक्ति ठरणार नाही.
सगरे साहेब, जरा इकडंही लक्ष द्या…!
नगर आरटीओचे अधिकारी ज्यावेळी एखाद्या भरधाव वेगाने जात असलेल्या वाहन चालकाविरुद्ध ‘ओव्हर स्पीड’ किंवा ‘सीड बेल्ट’चा ‘फाईन’ करतात, त्यावेळी त्या वाहनाचा चेसी नंबर किंवा इंजिन नंबर पाहतात का? नुसत्या नंबर प्लेटवरुन गुन्हा दाखल करणं, हे कितपत योग्य आहे? कदाचित संबंधिताने नंबर प्लेट बदलली असली तर? नक्की भरधाव वेगाने वाहन दामटविणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते, की भलत्याच वाहनचालकाचा बळी दिला जातो, याकडे नगर आरटीओचे सगरे साहेब यांनी लक्ष देण्याची गरज आहे.