करण गारदे / भिंगार
नगर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. तत्पूर्वी मोठमोठ्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवलं जातं. त्यानंतर वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतल्या चारही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. परंतु धक्कादायक बाब अशी आहे, की या ग्रामपंचायतीच्या एका सदस्यानं स्वतःच्या प्रभागातल्या ग्रामस्थांच्या मतांवर डोळा ठेवत रस्त्यालगत बायपास नळ कनेक्शन देण्याचा पराक्रम केला आहे.
या पार्श्वभूमीवर वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतल्या काही जागरुक ग्रामस्थांमधून नगर जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग झोपलाय का? वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतल्या ‘बायपास’ नळ कनेक्शन्सचा शोध कधी घेणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नगर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत देण्यात येणारे पाणी वास्तविक पाहता गावातल्या टाक्यांमध्ये जाणआवश्यक आहे. मात्र त्यापूर्वीच स्वतःच्या प्रभागातल्या ग्रामस्थांना पाणी मिळावं, यासाठी एका डोकेबाज ग्रामपंचायत सदस्यानं बायपास नळ कनेक्शन्स दिले आहेत. याचा परिणाम असा झाला, की पाण्याच्या टाक्या भरायला बराच उशीर होत आहे. त्यामुळे या बायपास नळ कनेक्शन्सचा शोध कधी घेण्यात येणार अशी विचारणा केली जात आहे.
… आणि एका पदाधिकाऱ्यानं भडकावली दुसऱ्या पदाधिकाऱ्याच्या श्रीमुखात …!
हा किस्सा तसा दोन-तीन महिन्यांपूर्वीच आहे. उशिरा पाणी येण्याच्या तक्रारी माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कानावर गेल्या. पाणीपुरवठा सुरळीत असताना पाणी उशिरा का येतं यासाठी त्यांनी वडारवाडी ग्रामपंचायत काही पदाधिकाऱ्यांची मिटिंग बोलावली. यामध्ये एका पदाधिकाऱ्यानं उशिरा पाणी येण्याला बायपास डळ कनेक्शन जबाबदार असल्याचं सांगितलं. मिटिंग संपल्यानंतर ज्या पदाधिकाऱ्याच्या संदर्भात हा विषय होता, त्या पदाधिकाऱ्याने प्रचंड आदळापट केली. मात्र हे सहन झाल्याने दुसऱ्या पदाधिकाऱ्याने मागचा पुढचा विचार न करता त्याच्या श्रीमुखात भडकावली. जुना असला तरी हा किस्सा आजही वडारवाडी परिसरात मोठ्या चवीनं चर्चिला जात आहे.