अहिल्यानगरनगर जिल्ह्यातले सर्वच अवैध धंदे कडकडीत बंद? जे पोलिसांना अशक्य ते खा....

नगर जिल्ह्यातले सर्वच अवैध धंदे कडकडीत बंद? जे पोलिसांना अशक्य ते खा. निलेश लंकेंच्या उपोषणानं झालं शक्य ? देशातल्या सर्वच खासदारांनी लंकेंच्या कार्यपद्धतीचा आता आदर्श घ्यायलाच हवा…!

Published on

spot_img

आज (दि. ७) आणि काल (दि. ६) या दोन दिवसांत नगर जिल्ह्यातल्या निवडक माहितगार नागरिकांना आम्ही प्रत्यक्ष भेटून, फोनवर संपर्क साधून नगर शहर तसंच परिसरासह जिल्ह्यातल्या अवैध धंद्याची माहिती जाणून घेतली. या प्रयत्नातून अशी माहिती समजली, की नगर जिल्ह्यातले जवळपास सर्वच अवैध धंदे कडकडीत बंद (?) आहेत.

अक्षरशः जे काम पोलिसांना करता आलं नाही, खासदार निलेश लंके यांच्या सहा दिवसांच्या उपोषणानं ते काम शक्य झालंय. त्यामुळे देशभरातल्या जवळपास सर्वच खासदारांनी आता नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांचा आदर्श घ्यायलाच हवा, असा मतप्रवाह नगर जिल्ह्यात पहायला आणि ऐकायला मिळत आहे.

नगर शहरात कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालूका आणि एमआयडीसी अशी पाच पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वी जुगार, मटका, बिंगो, हातभट्टी, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वाळू उपसा आणि वाहतूक असे धंदे सुरु होते. ही गंभीर बाब निदर्शनात आल्यानं संसदेच्या सभागृहात देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानादेखील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके हे नगरच्या एसपी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले.

या उपोषणादरम्यान खासदार लंके यांनी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांवरही गंभीर आरोप केले. अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार लंके यांच्या त्या उपोषणात सहभाग घेत त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. अगदी जळगाव जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी खासदार लंके यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला होता.

५ कोटी रुपयांच्या ‘ऑफर’चं काय?

या आमरण उपोषणाच्या वेळी खासदार निलेश लंके यांनी असा खळबळजनक आरोप केला होता, की त्यांना ५ कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिली गेली. आता खासदार लंके यांना ती ‘ऑफर’ नगर जिल्हा पोलीस दलातल्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यानं दिली, याचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे त्या ‘ऑफर’चं नक्की काय झालं असावं, या प्रश्नानं नगर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची झोप उडाली आहे.

खासदार निलेश लंके यांच्या आमरण उपोषणामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या उपोषणाचा परिणाम असा झाला, की नगर शहर, परिसरासह जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर या भागांत जुगार, मटका, बिंगो, हातभट्टी, अवैध वाळू उपसा आणि वाहतूक, चंदन तस्करी, अवैध प्रवासी वाहतूक हे सर्वच अवैध धंद कडकडीत बंद (?) आहेत, अशी माहिती मिळाली. नगरकरांनी मात्र या वस्तुस्थितीची किंवा अवैध धंदे सुरु आहेत की बंद आहेत, याची अवश्य शहानिशा करावी, असं नम्र आवाहन आम्ही करत आहोत.

अवैध धंद्यांना स्थानिक पोलिसांचा वरदहस्त?

दरम्यान, आम्हाला मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी आम्ही ग्रामीण भागांतल्या आमच्या काही मित्रांशी संपर्क साधून याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेवासे, शेवगाव, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, नगर तालुका आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वी जे अवैध धंदे राजरोसपणे सुरु होते, ते आता ग्रामीण भागातल्या वाड्या-वस्त्यांवर ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अशा पद्धतीने सुरु असून यासाठी स्थानिक पोलिसांचा अवैध धंदे करणाऱ्यांना वरदहस्त मिळत आहे, अशी धक्कादायक माहिती हाती आली. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, ही माहिती जर खरी निघाली, तर नगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला हे यासंदर्भात कशा प्रकारची भूमिका घेतात, हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.

खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाची
हीच का फलनिष्पत्ती?

तब्बल पाच ते सहा दिवस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केलेल्या आमरण उपोषणादरम्यान पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या आश्वासनानंतर खासदार निलेश लंके यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण मागं घेतलं. मात्र खासदार निलेश लंके यांनी ज्या उद्देशानं एस पी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं, तो त्याचा उद्देश साध्य झाला का? स्थानिक पोलिसांच्या वरदहस्तानं आजही अवैध धंदे ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सुरुच राहणार असतील तर खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाची हीच का फलनिष्पत्ती, असा सर्वांना अंतर्मुख करणारा सवाल यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या