नगर तालुक्यातल्या नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत सगळीकडे कचऱ्यांचेच ढीग दिसत आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या लावली जात नाही. वेळच्या वेळी तो कचरा उचलला जात नाही. नगरच्या ज्या ठेकेदाराला हा कचरा उचलण्याचं कंत्राट देण्यात आलेलं आहे, त्या ठेकेदाराचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पुढारी अर्थात ग्रामपंचायत सदस्यांच्या डोळ्यांवर भात बांधलाय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हल्ली पावसाळ्याचे दिवस आहेत. या कचऱ्यावर पावसाचे पाणी साचून त्यामध्ये डास होत आहेत. परिणामी सगळीकडे रोगराई पसरत आहे. त्यातच या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत असून स्थानिक रहिवाशांना यामुळे प्रचंड त्रास होत आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतीचे सदस्य या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाहीत? फक्त स्थानिक ग्रामस्थांच्या मतांवरच या ग्रामपंचायत सदस्यांचा डोळा आहे का? ग्रामस्थांच्या आरोग्याची या स्थानिक पुढाऱ्यांना अजिबात काळजी कशी नाही? असे विविध प्रकारचे प्रश्न संतप्त ग्रामस्थांमधून उपस्थित केले जात आहेत.
काय झालं जमीन खरेदीचं?
वडारवाडी आणि नागरदेवळे या दोन्हीही ग्रामपंचायतींच्या व्यथा सारख्याच आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना कचरा साठवण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी गावठाणच नाही. त्यामुळे आजूबाजूला एक दोन एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यानंतर हा विषय पुढे बारगळला. त्या जमीन खरेदीच्या निर्णयाचं काय झालं, असादेखील प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे.