पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या आईच्या नावानं एक झाड लावून त्याचं संगोपन करावं, अशी अपेक्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश राज्य आणि केंद्र सरकार सतत देत असतं. किंबहुना यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च केवळ जाहिरातींवर होत असतो. मात्र याचं कुठलंही भान ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला राहिलेलं नाही, असं वास्तव समोर आलं आहे.
नगर तालुक्यातल्या निंबळक ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोठी डेरेदार झाडं इलेक्ट्रिकल यंत्राच्या साह्याने कापून टाकण्यात आली आहेत. अतिशय किरकोळ कारणांमुळे ही झाडे तोडण्यात आली आहेत. या झाडांचा स्थानिक ग्रामस्थांना मोठा आश्रय होता. या झाडांमुळे परिसरात घनदाट सावली पडायची. ग्रामस्थांना शुद्ध हवा मिळायची. मात्र ही झाडे तोडल्यामुळे हा परिसर एकदम भकास तर झाला आहेच. मात्र या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे
या संदर्भात निंबळक ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसेवकाला विचारलं असता या संदर्भात मला कुठलीच माहिती नाही. तुम्ही सरपंचांना विचारा, अशी बजबाबदारपणाची उत्तरं दिली. एका अर्थानं वृक्षतोडीचा आणि आपला काहीच संबंध नाही किंवा आपण त्याला जबाबदार नाही, असंच उत्तर या ग्रामसेविकेनं दिलं आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या वृक्षतोडीला ग्रामसेवकच जबाबदार असतो. त्यामुळे असली बेजबाबदारपणाचं विधान करणाऱ्या या ग्रामसेविकेविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्यावतीनं करण्यात येत आहे.