अहिल्यानगरनेवाशातल्या राजकारणाचा उडालाय फज्जा...! कोणी, कोणासाठी आणि कोणाला आणलंय अडचणीत? ...

नेवाशातल्या राजकारणाचा उडालाय फज्जा…! कोणी, कोणासाठी आणि कोणाला आणलंय अडचणीत? तुम्हीच वाचा परखड आणि’रोखठोक’ राजकीय विश्लेषण…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघातल्या राजकारणाचा खेळ खंडोबा झाला. विचका झाला, पचका झाला. प्रचंड फज्जा उडालाय. या मतदारसंघात महायुतीनं जो उमेदवार दिलाय, त्या उमेदवाराला कसं पाडता येईल, त्या उमेदवाराची अनामत रक्कम (डिपॉझिट) कशी जप्त होईल, यासाठीचं नियोजन अनेकांनी सुरु केलं आहे. या मतदारसंघाचा हा जो काही राजकीय फज्जा उडाला आहे, तो कोणी केला, कोणासाठी केला आणि हे करत असताना कोणी कोणाला अडचणीत आणलं, यावर परखड असं भाष्य करणारा हा लेख तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा.

राजकीय महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला असते. अर्थात ती असणं यात काही वावगं नाही. मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा किती असावी आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणी किती खालच्या पातळीवरची ‘सेटलमेंट’, करायची, यालाही काही मर्यादा असतात. नेवासे तालुक्यात या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. या मतदारसंघाचा राजकीय पचका ‘सोनईकरां’च्या अतिमहत्त्वाकांक्षेतून, राजकीय लोभी आणि स्वार्थी प्रवृत्तीतूनच झाला आहे, ही बाब या तालुक्यातल्या शेंबड्या पोरांपासून वयोवृद्ध माणसालाही समजली आहे.

पंचगंगा सीड्स आणि पंचगंगा कारखान्याचे सर्वेसर्वा असलेले प्रभाकर काका शिंदे यांना स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट ‘फायनल’ होतं. ‘कामाला लागा’ असे आदेशदेखील एक महिन्यापूर्वी त्यांना देण्यात आले होते. विशेष म्हणजे शिंदे काका जर निवडणूक रिंगणात उतरले असते तर या मतदारसंघात ‘कांटे की टक्कर’ झाली असती आणि प्रस्थापितांना फार मोठा दणका बसला असता. मात्र तो दणका बसू नये, यासाठीच ‘सोनईकरां’नी ‘लोणीकरां’कडे साकडं घातलं, की शिंदे काकांना थांबवा. तरच आमचं राजकारण जीवंत राहील.

दुर्दैवाची बाब अशी, की ‘लोणीकर’देखील ‘सोनईकरां’च्या या साकड्याला भुलून गेले. ‘लोणीकरां’नी मुख्यमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं, शिंदे काकांना तिकीट न देता आम्ही सांगू त्या उमेदवाराला तिकीट द्या. अन्यथा संगमनेर आणि श्रीरामपूर या मतदारसंघाची जबाबदारी आम्ही घेणार नाही. मुख्यमंत्री कोंडीत सापडले. त्यानंतर शिंदे काकांना सांगण्यात आलं, की यावेळी तुम्ही थांबा. तुम्हाला विधानपरिषदेवर घेऊ. हसतमुख आणि सुस्वभावी असलेले शिंदे काका हसत हसत यासाठी तयार झाले.

हे सगळं सुरु असताना आणि ‘लोणीकरां’च्या मर्जीतला उमेदवार ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेवासा तहसील कार्यालयात आला, त्याचवेळी नेवासकरांमध्ये लोकप्रिय असलेले माजी आमदार ‘देवगावकर’ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ‘देवगावकर’ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी चक्क दुसऱ्याच पक्षाचा एबी फॉर्म भरत उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘देवगावकरां’च्या या भुमिकेमुळे नेवासे तालुक्यातल्या तरुणांसह ज्येष्ठ श्रेष्ठ नेवासकर प्रचंड संतापले आहेत.

सत्यासाठी की सत्तेसाठी…?

विधानसभा निवडणुकीसाठी काल (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये काहींनी अपक्ष उमेदवारी अर्जदेखील भरले. काहींनी तर दोन दोन तीन उमेदवार अर्ज भरले. राष्ट्रीय पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांसुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. येनकेन प्रकारेन आपलाच विजय या निवडणुकीत कसा होईल, यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवारानं तगडं ‘प्लॅनिंग’ केलं. मात्र हे करत असताना सामान्य नेवासकरांच्या भावना काय आहेत, नेवाशात आज प्यायला पाणीदेखील नाही. पाण्याचे जार विकत घेऊन नेवासकरांना तहान भागवावी लागत आहे. सोनईमध्येसुद्धा तीच परिस्थिती आहे. या तालुक्यातले रस्ते धड नाहीत. या तालुक्यात नवनवीन उद्योग आणण्याचा आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचा विचार आतापर्यंत झाला नाही. शैक्षणिक संस्था टाकून रग्गड पैसा कमवण्याचा धंदा मात्र सगळ्यात पहिल्यांदा करण्यात आलाय. यावरुन हे सारं जे काही चाललं आहे, ते सत्यासाठी आहे की सत्तेसाठी आहे, हेच नेवासकरांच्या लक्षात यायला तयार नाही.

 

फुकटची दारु पिणाऱ्यांनो, अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या…!

सुसंस्कृतपणाचा आव आणत ढोंगी राजकारण करण्याचा सपाटा या तालुक्यात अनेक दिवसांपासून सुरु असल्याचं नुकतीच मिसरुढ फुटलेल्या तरुणाच्या लक्षात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत मटणाच्या जेवणावेळी सुरु आहेत. दारूच्या पार्ट्या सुरु आहेत. फुकट मिळते म्हणून अनेक तरुण त्या दारुवर तुटून पडहेतात. निवडणूक काळात सरासरी महिनाभर फुकटची दारु मिळेल. मात्र त्यानंतर तुम्ही घरातली भांडीकुंडी विकून कर्जबाजारी होऊन आर्थिकदृष्ट्या कंगाल होऊन, ‘अट्टल बेवडे’ होणार आहात का? म्हणूनच सांगावसं वाटतं, फुकटची दारु पिणाऱ्यांनो, अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या.

‘सोनईकरा’सह ‘लोणीकरां’ना धडा शिकवण्याचाच निर्धार…!

विधानसभा निवडणुकीचं चित्र दिनांक 4 नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. कोण कोण निवडणूक रिंगणात उभे राहतील, कोण निवडून येईल, या प्रश्नाचं उत्तर भविष्यकाळात दडलेलं असलं तरी अनेक इच्छुकांपैकी कोणाच्या एकाच्याच गळ्यात विजयश्रीची माळ पडणार आहे. परंतु ज्याअर्थी ‘लोणीकरां’नी ‘सोनईकरां’च्या विनंतीला मान देऊन नेवासकरांवर जो उमेदवार बळजबरी लादला आणि या तालुक्याचं राजकीय वाट्टोळ केलं, त्याअर्थी ‘सोनईकर’ आणि ‘लोणीकरां’ना धडा शिकविण्यासाठी या तालुक्यातले शेकडो तरुण सरसावले आहेत. श्रीरामपूर मतदारसंघातला ‘लोणीकरां’नी दिलेला उमेदवार पाडण्यासाठी आणि विरोधी पक्षातल्या महिला उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी या तालुक्यातले अनेक कार्यकर्ते तिकडे जाणार आहेत. ‘सोनईकर’ आणि ‘लोणीकरां’ना धडा शिकविण्याचाच निर्धार या तरुणांनी केल्याचं खासगीत बोलून दाखवलंय.

तुम्ही आमचं वाटोळं केलं…! आता आम्ही तुमचं वाटोळ करु…!!

लोणीकरांना धडा शिकविण्याचा निर्धार नेवासे तालुक्यातल्या महायुतीच्या युवा कार्यकर्त्यांनी यासाठी घेतला आहे. लोणीकरांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणून प्रभाकर काका शिंदे यांना डावलून नावडता उमेदवार नेवासकरांवर लादला आणि या मतदारसंघाच राजकीय वाट्टोळं केलं, असा आरोप करत या तालुक्यातली तरुणाई लोणीकरांचं राजकीय वाट्टोळं करण्यासाठी किंबहुना संगमनेर विधानसभा मतदारसंघात  लोणीकरांनी खताळ आडनावाचा जो उमेदवार दिला आहे, त्या उमेदवाराच्या विरुद्ध या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचं काम करत राहता मतदारसंघातल्या प्रभावती घोगरे यांचा प्रचार करण्याचा निर्धार नेवासे तालुक्यातल्या महायुतीच्या युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. तुम्ही आमचं राजकीय वाट्टोळं केलं. आता आम्ही तुमचं राजकीय वाट्टोळं करु, अशी भूमिका या तरुणांनी घेतली आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या