अहिल्यानगरनेवासा भाजपचे तालूका संयोजक सचिन देसरडा यांची 'No settlement only development' ही...

नेवासा भाजपचे तालूका संयोजक सचिन देसरडा यांची ‘No settlement only development’ ही टॅग लाईन नक्की कोणासाठी…? देसरडा यांचा वाढदिवस दणक्यात साजरा…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

नेवासा तालूका भारतीय जनता पार्टीचे संयोजक सचिन देसरडा यांचा वाढदिवस आज (दि. ५) मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं घोडेगावातल्या त्यांच्या कापड दुकानासमोर देसरडा समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी केक कापून मोठ्या उत्साहात देसरडा यांचा वाढदिवस साजरा केला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देसरडा यांच्या या वाढदिवसाच्या छोटेखानी कार्यक्रमाची मात्र नेवासे तालुक्यात प्रचंड चर्चा आहे.

दरम्यान, देसरडा यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरच्या लोखंडी पुलावर देसरडा यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीचा भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्या फ्लेक्सवर छापण्यात आलेल्या ‘टॅगलाईन’नं मात्र या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ‘No settlement only development’ अशी ही टॅगलाईन विद्यमान आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे या दोघांपैकी नक्की कोणाला उद्देशून आहे, की दोघांसाठीच आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

विधानसभेसाठी स्वतंत्र नेवासा मतदारसंघातून सचिन देसरडा यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून केली जात आहे. त्यासाठीच तर देसरडा आणि समर्थकांची ही ‘जय्यत तयारी’ तर नाही ना, अशीदेखील चर्चा यावेळी ऐकायला मिळाली.

देसरडा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, शिंदे शिवसेना माथाडी कामगार संघटनेचे नितीन शिरसाठ, कांगोणीचे माजी सरपंच बंडू शिंदे, आगळे पाटील, प्रमोद घावटे पाटील, आदीनाथ पटारे, सुरेश डिके पाटील, सरपंच पांडूरंग वाघ, रोखठोक 24 न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक बाळासाहेब शेटे पाटील आदींसह नेवासे तालुक्यातल्या राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, पत्रकारिता आदीसह अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती.

‘THAR’ ‘थार’ गाडी आणि सचिन देसरडा यांची स्मितहास्यासह ‘नो कॉमेंट्स’…!

सचिन देसरडा यांच्या वाढदिवसाचा केक नव्या कोऱ्या ‘THAR’ ‘थार’ गाडीवरच कापण्यात आला. काळ्या  रंगाची ही नवी कोरी ‘THAR’ ‘थार’ गाडी आणि त्या गाडीवर देसरडा यांच्या फोटोसह ‘आमदारसाहेब’ अशी अक्षरं असलेलं छायाचित्रं पाहून या गाडीचं रहस्य काय असावं, असा प्रश्न अनेकांना पडला. अधिक माहिती घेतली असता ही गाडी राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मणीच्या नातेवाईकांनी देसरडा यांना भेट दिल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळाली. मात्र या चर्चेची शहानिशा करण्यासाठी सचिन देसरडा यांना विचारलं असता केवळ स्मितहास्य करत ‘नो कॉमेंट्स’ असं म्हणून दबक्या आवाजातल्या या चर्चेवर त्यांनी कायमचा पडदा टाकला.

आणखी महत्वाच्या बातम्या