बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचं कारण असं, की जायकवाडी बॅक वॉटर परिसरात पंचगंगा आणि स्वामी समर्थ या दोन्ही साखर कारखान्यांचा चाचणी हंगाम लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे ऊस दर आणि पळवापळवीचा संघर्ष अटळ असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ऊस दरासाठीही तीन ते चार साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
नेवासे तालुक्यातल्या इथला ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना
आणि सोनईचा मुळा सहकारी कारखाना
हे दोन्ही साखर कारखाने प्रस्थापितांचे साखर कारखाने असून या दोन्हीही कारखान्यांना 12 ते 13 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे. अशा परिस्थितीत माजी मंत्री विजय शिवतारे
यांचा वरखेडचा स्वामी समर्थ कारखाना आणि नेवासे तालुक्यातल्या खुपटी इथले उद्योजक प्रभाकर काका शिंदे
यांचा वैजापूर तालुक्यातल्या महालगाव परिसरात असलेला पंचगंगा साखर कारखाना असे हे दोन्हीही साखर कारखाने ऊस गाळप करण्यासाठी सरसावले आहेत.
शेवगावच्या गंगामाई साखर कारखान्यासह पाथर्डीचा वृद्धेश्वर, प्रवरेचा विखे पाटील, संगमनेरचा थोरात, श्रीरामपूरचा अशोक त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या कुकडी, श्रीगोंदा या सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या नेवासे तालुक्यात कार्यरत राहणार आहेत.
प्रभाकर काका शिंदे यांचा पंचगंगा आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचा स्वामी समर्थ कारखाना या दोन्हीही कारखान्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असं असलं तरी ऊस दराचा आणि ऊस पळवापळवीचा संघर्ष मात्र अटळ असल्याचं दिसून येत आहे.