अहिल्यानगरपुन्हा एकदा 'जय हरी'?, शंकरराव गडाख बाजी मारणार? की तिसरा पर्याय? नेवाशात...

पुन्हा एकदा ‘जय हरी’?, शंकरराव गडाख बाजी मारणार? की तिसरा पर्याय? नेवाशात काय आणि कसं होणार?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर

स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे इच्छुकांची गर्दी तर दुसरीकडे राजकीय सत्तेची बलस्थानं असलेल्या विद्यमान आमदार शंकरराव गडाखांसह अनेकांच्या राजकीय अस्तित्वाच्या या लढाईत नक्की कोण बाजी मारणार, याकडे तमाम नेवासकरांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ‘जय हरी’चा नारा घुमणार, शंकरराव गडाख बाजी मारणार की तिसरा पर्याय निवडला जाईल? एकूणच नेवाशात काय आणि कसं होणार, हाच अनेकांना पडलेला ज्वलंत प्रश्न आहे.

साखर कारखाना, शनिशिंगणापूर देवस्थान, मुळा बाजार, सहकारी सोसायट्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायतींची एक हाती सत्ता विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे असल्यानं त्यांचं पारड नेहमीप्रमाणे यावेळच्या निवडणुकीतदेखील जड वाटत आहे.

असं असलं तरी राजकीय सत्तेची कुठलीही बलस्थानं ताब्यात नसताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यापूर्वी गडाखांचा पराभव केलेला आहे, हे विसरुन चालणार नाही. प्रस्थापितांच्या विरुद्ध सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सर्वसामान्य व्यक्तिमत्व, अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि सर्वांना आपलेसं करुन घेणारे ‘जय हरी’ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अल्पावधीतच राजकीय छाप पडली होती. माजी खासदार स्व. तुकाराम गडाखांच्यानंतर भक्कम पर्याय मिळाला, असं नेवासकरांना वाटलं होतं.

नेवासकरांच्या दुर्दैवानं माजी आमदार मुरकुटे आणि विद्यमान आमदार गडाख हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा प्रत्यय आला आणि सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मुरकुटे यांनी गडाखांशी छुपी हातमिळवणी केल्याचा आरोपदेखील यापूर्वी अनेक वेळा वर्तमानपत्रांमधून करण्यात आला. परिणामी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्तांच्या कमिटीमध्ये सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, असेदेखील आरोप त्यावेळी करण्यात आले होते.

राजकीय चक्रं फिरली आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव करत आमदारकीसह मंत्रीपददेखील पदरात पाडून घेतलं. परंतू नेवाशाला मंत्रीपद मिळूनदेखील या तालुक्याचं भकासपण दूर झालं नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गडाख आणि मुरकुटे यांना शह देण्यासाठी तिसरा पर्याय उदयास आला.

या तिसऱ्या पर्यायांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी खासदार स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख यांचे बंधू किसनराव गडाख (पेशवे), माजी खासदार स्वर्गीय गडाख यांचे पुत्र रविराज गडाख, हॉटेल लिलियम पार्क उद्योग समुहाचे संस्थापक संचालक सुरेश शेटे पाटील, डॉ. वैभव शेटे पाटील, ज्ञानेश्वर माऊली पेचे, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील आदींसह अनेक इच्छुकांचा समावेश आहे. अर्थात या सर्वांचं एकमत झालं नाही तर मतांची विभागणी होऊन विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचा पुन्हा एकदा विजय होऊ शकतो.

… त्यावेळी प्रशांत आता ‘विजय’…!

शंकरराव गडाखांना बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात आमदार करण्यासाठी 2019 च्या निवडणुकीत प्रशांत गडाख यांनी जबरदस्त खिंड लढवली होती. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या अनेक भागांच्या मालिकेने चमत्कार केला होता. या चमत्कारामुळे गडाख आमदार झाले. यावेळच्या निवडणुकीत मात्र प्रशांत गडाख आजारी असल्यामुळे सहभागी होतील की नाही, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. पण त्यांच्याऐवजी गडाखांची खिंड लढण्यासाठी आता त्यांचे बंधू उद्योगपती विजय गडाख राजकीय मैदानात उतरले आहेत. तेव्हा ‘प्रशांत’ आणि आता ‘विजय’ असल्यामुळे शंकरराव गडाख पुन्हा आमदार होतील का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गडाख – मुरकुटे विषयी नाराजी नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ शेवटची प्रचार सभा नेवासे तालुक्यातल्या माळीचिंचोरे इथं पार पडली होती. त्या सभेत फडणवीस यांनी जाहीर घोषणा केली होती, की नेवासा तालुक्याचा एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार आहे. फक्त त्यावर सही करायचीच बाकी आहे. ती करुन त्या आराखड्यानुसार नेवाशात विकासकामं सुरु करण्यात येतील. मात्र दुर्दैवानं मुरकुटे यांचा पराभव झाला. पण फक्त सही राहिलेल्या नेवाशाच्या विकास आराखड्याचं पुढे काय झालं, याचा पाठपुरावा ना गडाखांनी केला ना पराभूत झालेल्या मुरकुटे यांनी केला. या व्यतिरिक्त अनेक महत्वपूर्ण निर्णयांमध्ये गडाख आणि मुरकुटे यांची छुपी हात मिळवणी असल्याचा आरोप आजही होत आहे. परिणामी या दोघांविषयी तालुक्यात नाराजीचे वातावरण आहे. मात्र या दोघांविषयीची ही नाराजी नक्की कोणाच्या पथ्यावर पडते, याचं उत्तर भविष्यकाळात दडलं आहे.

सर्वच आजी-माजी एकत्र येऊन विचार करतील?

राज्याचं मंत्रीपद मिळाल्यानंतर नेवासा तालूका हा एक ‘मॉडेल’ विधानसभा मतदारसंघ होईल, अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र शंकरराव गडाखाना जे मंत्रीपद मिळालं, त्यातून नेवाशाच्या पदरात नक्की काय पडलं, हाच मोठा प्रश्न आहे. या तालुक्यात करण्यासारखं खूप काही आहे. संत ज्ञानेश्वरांचा पावन पदस्पर्श लाभलेल्या या भूमीने जगाला अनमोल असा उपदेश केला. मौलिक असे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे ग्रंथ याच पुण्य भूमीतून जगाला मिळाले. त्यामुळे कमीत कमी या तालुक्यात ‘संत ज्ञानेश्वर आयटी पार्क’ची स्थापना करुन इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं लक्ष पुन्हा एकदा नेवाशाकडे कसं वेधलं जाईल, यासाठी खरं तर प्रयत्न करणं आवश्यक आहे. इथला सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीसाठी नगर, मुंबई, पुणे, नवीदिल्ली, गुजरात अशा ठिकाणी भटकंती करतो आहे. या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नेवाशाच्या आजी माजी सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विचार करणं आवश्यक आहे.

ऋषिकेश शेटे पाटील यांचं तगडं आव्हान…!

राजकीय सत्तेची सर्वच बलस्थानं विद्यमान आमदार शंकराव गडाख यांच्याकडे असली तरी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी गडाखांना चांगलंच घेरलं असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा संघर्ष एकाकी नसून अनेकांची त्यांना ‘आतून’ साथ आहे. सर्वच गोष्टी सर्वांना जाहीररित्या स्पष्ट बोलता येत नाहीत. त्यामुळे गडाख आणि मुरकुटे यांच्याविषयी नाराज असलेली बरीच मंडळी ऋषिकेश शेटे पाटील यांच्या संपर्कात आहेत. एका अर्थानं राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेल्या विद्यमान आमदार शंकराव गडाख यांच्यासमोर ऋषिकेश शेटे पाटील यांनी तगडं आव्हान उभं केल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या