मराठा समाज बांधवांच्या मतांवर जे सत्ताधारी झाले, आर्थिकदृष्ट्या गब्बर झाले, सर्व काही मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांची हक्काचं आरक्षण मागण्याची वेळ आल्यावर मराठा समाजाच्या विरोधात हे सारे प्रस्थापित (महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच पुढारी) उभे राहिले. मराठा समाजाचे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, लघु उद्योजक, नोकरदार, हमाल, वडापावच्या गाड्या चालवणारे, कंपनीत काम करणारे कामगार, किराणा दुकानदार अशा मराठा समाजाच्या सर्वांनाच यांनी त्रास दिला. मराठ्यांची पोरं यांच्यासाठी फक्त प्रचाराची पत्रकं चिटकवण्यासाठी होती. पण यापुढे आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही यांना झटका द्यायचा, असं आवाहन करत प्रस्थापित पुढाऱ्यांनो, मराठ्यांची पोरं तुमच्या बापाचे नोकर आहेत का? अशी सिंहगर्जना मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्यानगर (अहमदनगर)मध्ये बोलताना केली.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी नगरमध्ये काल (दि. १२) ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लाखोंचा जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला होता.
नगरच्या माळीवाडा परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळाला अभिवादन करून या शांतता रॅलीला प्रारंभ झाला.
शहराच्या विविध भागांतून ही रॅली चौपाटी कारंजा इथं आली आणि जाहीर सभेनं या शांतता रॅलीची सांगता करण्यात आली. या सांगता सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधक अर्थात महायुती आणि महाआघाडीच्या पुढार्यांवर जहरी टीका केली.
दरम्यान, येत्या दिनांक 29 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं होणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या विराट सभेत विधानसभेला नक्की काय भूमिका घ्यायची, याविषयीचा निर्णय होणार आहे. नाव घेऊन पाडा, असा निर्णय झाला तर बिनधास्त या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पाडा, असं आवाहनदेखील जरांगे पाटील यांनी केलं.