रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
शेअर मार्केटमध्ये केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर ११ टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून फरार झालेल्या नितीन सूर्यकांत वेताळ याला पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देऊ. त्या नोटिशीला आरोपीनं उत्तर न दिल्यास अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका सोनई पोलिसांनी घेतली आहे.
फरार आरोपी वेताळ याने सोनईचे शरद काळे पाटील यांची मागच्या वर्षी २ लाख रुपयांची फसवणूक केली. शेअर मार्केटमध्ये ‘डिपॉझिट’ ठेवल्यास ११ टक्के परतावा देण्यात येईल, असं आमिष फरार आरोपी वेताळ याने काळे पाटील यांना दिलं होतं. काळे पाटील यांनी वेताळ याला दि. २५.५.२०२३ रोजी मर्चंट बँकेच्या करंट खात्यातून आरटीजीएसद्वारे २ लाख रुपये दिले होते.
वेताळ यांनी ११ टक्के प्रमाणे काळे पाटील यांना दोन महिन्यांचे ४४ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर परतावा द्यायला असमर्थता व्यक्त केली. आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर काळे पाटील यांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी वेताळविरुध्द गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून वेताळ फरार झाला आहे. सोनई पोलीस त्याला कधी अटक करणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
… तर पालकमंत्री विखेंकडे तक्रार : काळे पाटील
शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये आर्थिक फसवणूक करुन फरार झालेल्या नितीन वेताळ याच्याविरुद्ध गुन्हा करायला सोनई पोलिसांनी पंधरा दिवस उशीर केला, असा आरोप करत शरद काळे पाटील यांनी सोनई पोलिसांच्या या भुमिकेविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. खासगीत बोलताना ते म्हणाले, ‘फरार आरोपीला हजर होण्याची नोटीस देण्याची भूमिका घेणाऱ्या सोनई पोलिसांना खरं तर पुन्हा एकदा प्रशिक्षणाची गरज आहे. या पोलिसांच्या अशा कार्यपद्धतीविषयी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे लवकरच तक्रार करणार आहोत’.