अहिल्यानगरबेजबाबदारपणाचा कळस आणि किळसवाणं राजकारण...! नारीशक्तीचा अपमान 'नहीं सहेगा हिंदुस्थान'...! ...

बेजबाबदारपणाचा कळस आणि किळसवाणं राजकारण…! नारीशक्तीचा अपमान ‘नहीं सहेगा हिंदुस्थान’…! पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात हे काय चाललंय?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

नारीशक्तीचा सन्मान करणारी आपली संस्कृती. महिलेला आदिशक्ती, दुर्गा, लक्ष्मी म्हणून मान देण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. राज्यशासनही ‘महिला सन्मान योजना’ राबवते. ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत महिलांसाठी आपल्या राज्य सरकारनं तब्बल ४६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र एकीकडे हे असं सुरु असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये एका मुलीबद्दल सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून अश्लाघ्य आणि प्रचंड अपमानजनक वक्तव्य करण्यात आलंय.

या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पण प्रश्न हा आहे, एका मुलीबद्दल किंवा महिलेबद्दल असं खालच्या पातळीवरचं वक्तव्य करण्याची खरंच गरज आहे का? आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते का? खरं तर हा खरोखरच बेजबाबदारपणाचा कळस आहे. इतकं किळसवाणं राजकारण यापूर्वी कधीही पहायला मिळालं नाही.

या पार्श्वभूमीवर राज्यातल्या महिलांसह पुरुष वर्गही मनातल्या मनातनारीशक्तीचा अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत आहेत. मनातल्या मनात एवढ्यासाठी की सध्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु असल्यानं जाहीर घोषणा देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात हे काय चाललंय, असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार, सरकारी कार्यालयात सहकारी महिलांचं पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केलं जाणारं लैंगिक शोषण, दारुड्या नवऱ्याकडून महिलेचा होणारा कौटुंबिक छळ, अल्पवयीन मुलीवर तरुण आणि अक्षरशः वयाची साठी ओलांडलेल्या वासनांध पुरुषांकडून केला जाणारा जबरी संभोग हे कमी म्हणून की काय, सासऱ्याकडून सुनेवर, दीराकडून भावजयीवर, मामाकडून भाचीवर, चुलत, मावस किंवा मानलेल्या भावाकडून बहिणीवर बलात्कार झाल्याच्या दररोज वाचायला मिळणाऱ्या बातम्यांवरुन तरी तुम्ही आम्ही खडबडून जागे होणार आहोत की नाही?

राजकारणी मंडळी खरं तर समाजातले जबाबदार आणि हजारो लोकांचं नेतृत्व करणारे, दूरदृष्टीकोन असणारे, बौद्धिक क्षमता असलेले, लोकांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शपथ घेणारे पुढारी असतात. पण या लोकांची जीभ अशी कशी घसरते, हाच मोठा प्रश्न जनसामान्यांना पडलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणानं एकेकाळी देशाला विकासाची वाट दाखवली आहे. आशिया खंडातला पहिला साखर कारखाना महाराष्ट्रात सुरु झाला आणि यातून सहकाराची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेल्याचं आपण मोठ्या गर्वानं सांगत असतो. दुर्दैवानं त्याच पिढीतल्या लोकांच्या अप्रत्यक्ष वरदहस्तामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात एका मुलीचा जाहीर सभेत घोर अपमान केला गेला. सत्ताधारी मंडळी तरी हे सारं उघड्या डोळ्यांनी का पाहत आहेत? म्हणूनच तर काही लोकांना सहआरोपी करण्याची मागणी केली गेली नाही ना? एका मुलीबद्दल असं अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याची जबाबदार नेत्यानं खरं तर कानउघाडणी करणं आवश्यक होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही.

कलियुगातल्या द्रौपदींनो, भगवान श्रीकृष्णाची वाट पाहणं निरर्थक आहे…!

सत्ययुग संपण्याच्या वेळी जे महाभारत घडलं, अर्थात घणघोर युद्ध झालं, त्या युध्दाच्या अनेक कारणांपैकी नारीशक्तीचा अपमान हे एक कारण होतं. महाभारत होण्यापूर्वी दुर्योधन आणि इतरांनी पांडवांची पत्नी द्रौपदीचं ज्यावेळी वस्त्रहरण केलं, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी तिची अब्रू वाचवली.

पण आता कलियुग सुरु आहे. या घोर कलियुगात महिलेसोबत कधी, कुठं काय होईल, हे कोणालाच सांगता येणार नाही. म्हणूनच राज्यातल्या तमाम नारीशक्तीला एवढंच सागावसं वाटतं, की ‘अबला’ ही ओळख पुसून टाका. तुमच्या तुम्हीच आता समर्थ आणि सक्षम व्हा. कारण सत्ययुगात अंतर्धान पावलेले भगवान श्रीकृष्ण तुमची अब्रू वाचवायला आता येतील की नाही, हे सांगणं महाकठीण आहे. त्यामुळे हल्लीच्या या घोर
कलियुगातल्या द्रौपदींनो, भगवान श्रीकृष्णांची वाट पाहणं निरर्थक आहे.

कारवाई काय करणार हे सांगाल का…?

दरम्यान, संगमनेरमध्ये एका मुलीबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याचं समर्थन होऊ शकत नाही. तातडीनं त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला असल्याचं संबंधित माजी खासदार सांगत आहेत. ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या भावना या खासदार महाशयांनी दाखविली आहे. मात्र मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या देशमुखांविरुद्ध नक्की काय कारवाई केली जाणार, हे सांगण्याची तयारी खासदार महोदय सांगतील का, हे पहावं लागणार आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या