बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. यासाठी राज्यातल्या अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून उमेदवारीची ‘फिल्डिंग’ लावली आहे. मतांची गणितं मांडली जात आहेत. येनकेन प्रकारेन आमदार होण्याचा निर्धार अनेक इच्छुकांनी केला असून या सर्वांनी मतदारांना गृहित धरलं आहे. मात्र आमदारकीच्या धुंदीत असलेल्या या सर्वांना आम्ही जाहीरपणे सांगत आहोत, की भावी आमदारांनो, मतदारांना हलक्यात घेऊ नका. त्यांना गृहित तर अजिबात धरु नका. ते कधीही तुमचा ‘पोलिटिकल’ ‘इन्काऊंटर’ करु शकतात.
पूर्वीच्या काळी म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वी निवडणूका लढणं आणि जिंकणं खूप सोपं होतं. आजच्या सारख्या जेवणावळी नव्हत्या. पैशांचं वाटप नव्हतं. दारु आणि मटणाच्या पार्ट्या देणं, ही कल्पनाच अस्तित्वात नव्हती. भेळ भत्त्यावर कार्यकर्ते जोमानं आणि प्रामाणिकपणे नेत्याचं काम करायचे. अलीकडच्या काळात मात्र परिस्थिती पूर्णतः बदलली आहे.
प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलेल्या सोशल मिडियामुळे नवमतदारदेखील चांगल्यापैकी ‘हुशार’ झाले आहेत. या मतदारांना भूलथापा किंवा विविध प्रकारची ‘गाजरं’ दाखवून आमदारकीच्या निवडणुकीत निवडून येणं एवढं सोपं राहिलेलं नाही.
जनतेत ज्यांची विश्वासार्हता आहे, ज्यांनी जनतेला पर्यायानं मतदारांना रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांच्या व्यतरिक्त युवा मतदारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असेल अशा संभाव्य उमेदवारांच्या पाठीशी मतदार कायमस्वरुपी उभे राहतील. मात्र ज्यांनी पाच वर्षे जनतेची कुठलीही कामं न करता केवळ पैसाच कमवला, कागदोपत्री कामं दाखवत ज्यांनी कोट्यवधी रुपये कमवले, ते निवडणुकीत हा पैसा बाहेर काढतील. प्रचंड प्रमाणात तो पैसा उधळतील. पण सूज्ञ मतदार अशा प्रलोभनांना आता बळी पडण्याची शक्यता अजिबात नाही.
सूज्ञ मतदारांनो, कामचुकार उमेदवारांना थारा देऊच नका…!
एखादा विद्यार्थी आजचा अभ्यास उद्यावर ढकलतो. उद्याचा अभ्यास परवावर ढकलतो. परीक्षा अजून बरीच लांब आहे. नंतर अभ्यास करु, असा विचार करत त्याचं लक्ष नुसतं खेळण्याकडेच असतं. परंतु ज्यावेळी परीक्षा एक-दोन महिन्यांवर येऊन ठेवते, त्यावेळी सात ते आठ विषयांपैकी नक्की कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा, या विवंचनेत तो पडतो. परिणामी नापास होतो. अशीच अवस्था राज्यातल्या काही कामचुकार लोकप्रतिनिधींची झालेली आहे. पाच वर्षे या लोकांनी सामान्य जनतेला विट्टीसारखं ‘कोलून’ लावलं. पैशांतून सत्ता, सत्तेतून पैसा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या स्वार्थी मंडळींनी जनतेच्या प्रश्नांना अजिबात महत्त्व दिलं नाही. आता निवडणूक तोंडावर आल्यानं या स्वार्थी मंडळींना मतदारांचा प्रचंड पुळका आलेला आहे. पण सूज्ञ मतदारांनो, अशा कामचुकार आणि स्वार्थी उमेदवारांना थारा देऊच नका.
‘साहेब’ तुम्ही नेहमी जनतेला गुंगारा दिला, आता जनता काय करते ते पहाच…!
काही लोकप्रतिनिधी इतके बेजबाबदार असतात, की त्या लोकप्रतिनिधींना कामानिमित्त भेटायला आलेल्या सामान्य लोकांना हे लोकप्रतिनिधी अतिशय चलाखपणे गुंगारा देण्यात यशस्वी होतात. ‘साहेब’ त्यांच्या केबिनमध्ये बसलेले दिसतात. पण अचानक मागच्या दारानं पसार होतात. पाच वर्षे गुंगारा देणाऱ्या या लोकप्रतिनिधींना जाहीरपणे सांगत आहोत, की ‘साहेब’, तुम्ही नेहमी जनतेला गुंगारा दिला. आता तुमची नाडी जनतेच्या हातात आहे. तेव्हा जनता आता काय करते, ते पहाच.