बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
सुखी संसाराची धूळधाण करणाऱ्या मटक्याची भिंगारकरांना आता चांगलीच सवय लागली आहे. सामान्य माणसाचा घामाचा पैसा या धंद्यात वाया जात असून भिंगारचा शुक्रवार बाजार तळ हा तर अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेला भिंगारच्या वाघस्कर गल्लीतला कुल’दीपक’ या अवैध धंद्यांना अतिशय इमानेइतबारे सुरक्षा देत आहे. दुर्दैवानं या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मात्र हाताची घडी घालून भिंगारकरांची आर्थिक बरबादी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
भिंगारच्या शुक्रवार बाजारतळ, पाण्याच्या टाकीखाली, वडारवाडी, आलमगीरनगर या परिसरातही अवैध धंद्यांना सध्या चांगलीच बरकत आल्याचं दिसत आहे. हातावर पोट असलेला सामान्य माणूस या धंद्याच्या प्रचंड आहारी गेला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर घरातल्या दोन्हीही ‘लक्ष्मीं’वर (गृहिणी आणि पैसा)
सध्या मोठ्या प्रमाणात अवकळा आल्याचं दिसत आहे.
मटका, बिंगो, हातभट्टीची दारु विक्री असे धंदे भिंगारमध्ये प्रचंड प्रमाणात बोकाळले आहेत. हे धंदे करणारे आर्थिकदृष्ट्या ‘गब्बर’ झाले असून सामान्यांना वाकुल्या दाखवत भिंगार कॅम्प पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे करत आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी एस पी ऑफीसच्या समोर उपोषण करुनही आजमितीला सगळीकडे अवैध धंद्यांचाच बोलबाला दिसत आहे.
एसपी साहेब, कुल’दीपक’ची झाडाझडती घ्याल का?
मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसाला ज्या कोणापासून शारिरिक, मानसिक, आर्थिक त्रास होत असेल त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी खरं तर पोलिसांवर आहे. मात्र भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे
काही पोलीस कर्मचारीच अवैध धंदे करणाऱ्यांना सुरक्षा देत आहेत. यामध्ये भिंगारच्या वाघस्कर गल्लीतला कुल’दीपक’ सगळ्यात पुढे आहे. अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला या कुल’दीपक’ची झाडाझडती घेतील का, हाच खरा प्रश्न आहे.