रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
‘गेल्या 14 महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आपण सर्वांनी लढा पुकारला. मात्र सत्तेत असलेल्या काहींनी मराठा समाज आरक्षणात आला तर आमच्या आरक्षणाला धक्का लागेल, अशी भीती व्यक्त केली. मात्र मराठा समाजाच्या नाकावर टिच्चून 16 – 17 जाती आरक्षणात घातल्या, तेव्हा त्यांना धक्का लागला नाही का?
मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर महाविकास आघाडीकडून तसं लिहून आणा. मगच आरक्षण मिळेल, असा युक्तिवाद करणाऱ्यांनी 16 – 17 जाती आरक्षणात घालण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून लिहून आणलं होतं का? असे प्रश्न उपस्थित करत अन्याय करणाऱ्यांना आता उखडून फेकावंच लागणार’, अशी गर्जना मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातल्या नारायण गडावरुन कोट्यवधी मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना केली.
प्रारंभी नारायण गडाचे महंत शिवाजी बाबाजी महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील आता यापुढे उपोषण करणार नाहीत. आतापर्यंत त्यांनी उपोषण केलं. उपोषण हे तप आहे आणि नारायणगड ही तपोभूमी आहे. मात्र जरांगे पाटलांनी केलेल्या तपाची सांगता करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर जरांगे पाटील यापुढे उपोषण करणार नाहीत’, अशी स्पष्ट ग्वाही नारायण गडाचे महंत शिवाजी बाबाजी महाराज यांनी यावेळी बोलताना दिली.
जरांगे पाटील म्हणाले ‘मला विश्वास नव्हता मराठी एवढ्या करोडोंच्या संख्येनं इथं येतील. नारायणगड ही पवित्र तपोभूमी आहे. या भूमीत राजकीय भाष्य मी करणार नाही. मात्र समाजावर जो अन्याय केला जात आहे. त्या अन्यायाविरुद्ध आता आपल्या सर्वांना पेटून उठावंच लागणार आहे. त्यासाठी मला इथं जमलेल्या सर्वच मराठा समाजबांधवांकडून एक शब्द हवा आहे. तो शब्द म्हणजे तुम्ही हट्ट करु नका. मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही. माझ्या समाजाच्या लेकराबाळांच्या सुखासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा समाज बांधवांच्या डोळ्यातले अश्रू पाहू शकत नाही. मात्र यापुढे मी जे सांगेल तेच तुम्हाला करावं लागेल. मराठा समाजातल्या मुलांवर आरक्षणामुळे जो अन्याय आतापर्यंत होत आला आहे, तो थांबविण्यासाठी आता आपल्याला, जे आपल्या विरोधी आहेत, त्यांनाच उखडून फेकायचं आहे’.
तब्बल 500 एकर जागेत झालेला मराठ्यांचा शांततेतला हा मेळावा न भूतो न भविष्यती असाच होता. या नारायणगडावरुन जरांगे पाटलांनी फारसं राजकीय भाष्य केलं नसलं तरी यापुढे काय करायचं, सत्ताधाऱ्यांना उखडून कसे फेकायचं, याचे स्पष्ट संकेत दिले. खरं तर राज्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये शिंदे, फडणवीस, पवार हे असून केंद्राच्या सत्तेत मोदी शहा हे आहेत. आता यापैकी नक्की कोणाला उकडून फेकायचं, या प्रश्नाचं उत्तर मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या यश आणि अपयशावरच अवलंबून आहे.