मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं गेल्या एक वर्षापासून सुरू झालेलं आंदोलन आजही गोंधळलेल्या स्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आंदोलनाची दिशा चुकलेली असून सुरुवातीला मराठवाड्यातल्या मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी सरकारनं दाखवूनसुद्धा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी फक्त मराठवाड्यालाच आरक्षण न देता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली.
विशेष म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मराठवाड्यातल्या मराठा समाजबांधवांना आरक्षण देण्याच्या तयारीत सरकार असल्याची स्पष्ट कबुली एका व्हिडिओद्वारे देत आहेत. या व्हिडिओत मराठवाड्याला मिळणारं आरक्षण आपणच नाकारल्याचं जरांगे सांगत आहेत. मात्र त्यानंतर सातत्यानं त्यांची मागणी बदलत गेली. जरांगे यांच्या सातत्यानं बदलत्या या भूमिकेमुळे मराठवाड्यावर आरक्षणासंदर्भात अन्याय झाला असल्याचा आरोप मराठा आंदोलनाचे नेते किशोर चव्हाण यांनी केला आहे.
राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचं विस्तृत विश्लेषण करणाऱ्या एका युट्युब चॅनलशी बोलताना चव्हाण यांनी हा आरोप केला आहे. चव्हाण म्हणाले, की मराठा समाजाची नेमकी मागणी कोणती आहे, हेच न समजल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्यांची भूमिका स्पष्ट करायला सध्यातरी तयार असल्याचं दिसत नाही.
महाराष्ट्रातल्या सर्वच मराठा समाजबांधवांना ओबीसीत घ्यायला कुठल्याच पक्षाची स्पष्ट अशी भूमिकादेखील नाही. मात्र आमची मूळ मागणी अशी होती, की मराठवाड्यातल्या मराठा समाजबांधवांना ओबीसीतून आरक्षण द्या, कुणबी समाजाचे प्रमाणपत्रं द्या. ही मूळ मागणी मी मुख्यमंत्र्याकडे मांडली होती. कारण सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण नाकारलं आहे. मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रातल्या सर्वच मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी कितपत योग्य आहे?
चव्हाण पुढे म्हणाले, की मनोज जरांगे यांनी आमची मूळ मागणीची जी होती, की मराठवाड्यातल्या मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्रं द्या, ही मागणी सोडून मनोज जरांगे यांनी सरकारशी चर्चा करताना दुसऱ्याच मागण्या पुढे केल्या. त्यामुळे सर्वत्र गोंधळ पाहायला मिळत आहे.
आरक्षणावरुन सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यातच झाल्या आहेत. मात्र आज देखील मराठवाड्यावर आरक्षणासंदर्भात अन्याय सुरु आहे. कुणबी आरक्षण घेण्यावरुन उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, कोल्हापूर अशा ठिकाणच्या मराठा समाज बांधवांमध्ये मतभेद आहेत. कोकण आणि कोल्हापूरचे मराठा समाज बांधव कुणबीतून आरक्षण न देता सरकारने मराठा म्हणून आरक्षण द्यावं, अशी मागणी करत आहेत.
किशोर चव्हाण हे मराठा आंदोलनाचे नेते असून मराठा समाजाच्या प्रश्नांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोज जरांगे यांच्यासोबत काम करत आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारशी बोलणी करायला चव्हाण यांना दोन वेळा महत्त्वाच्या बैठकींना पाठवलं आहे. मात्र आता या आंदोलनाचे नेते असलेले जरांगे हे सतत भूमिका बदलत असल्यामुळे चव्हाण हे काही नाराज झाले आहेत.
चव्हाण यांची इच्छा आहे, की जरांगे यांनी या आंदोलनाचा कळस व्हावा ते पाया व्हायला तयार आहेत. मात्र जरांगे हे या आंदोलनाचा कळस व्हायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या वाऱ्यावर सोडून चालणार नाही. मराठवाड्यातल्या मराठा समाज बांधवांच्या मागण्या व्यवस्थितपणे जरांगे सरकार बरोबर बोलताना मांडत नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यामुळे मला समाजासाठी आणि या समाजातल्या आत्महत्या थांबविण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. कितीही टीका टिपण्णी, आरोप प्रत्यारोप झाले तरी मी संघर्ष करणारच आहे, असा निर्धार चव्हाण यांनी स्पष्ट बोलून दाखवला.