बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
भोळ्याभाबड्या ठेवीदारांची कशा पध्दतीनं आर्थिक लूट करायची, याचं प्रशिक्षण मल्टिस्टेट आणि पतसंस्थांच्या संचालक मंडळानं नक्की कुठून घेतलं असावं, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. पण ठेवीवरचं व्याज देणं बंद करुन कर्जदारांच्या कर्जावर मात्र व्याजावर व्याज लावायचा सपाटाच ही मंडळी लावताहेत. कर्जदार इतका वैतागून जातो, की कर्ज आपण घेऊन फार मूर्खपणा केल्याची भावना त्याच्या मनात येते.
मित्रांनो, मल्टिस्टेटचा दरोडा या लेखमालेचा ९ वा भाग देताना मल्टिस्टेटच्या चेअरमन आणि संचालक मंडळाचा कपटी डाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही मंडळी ठेवीदारांच्या ठेवीवरचं व्याज देणं बंद करत एकप्रकारे ठेवींवरचं व्याज ते गायब करतात. कर्जदाराला मात्र प्रचंड हैराण करुन सोडतात.
दरम्यान, मल्टीस्टेटचं कार्यालय किंवा कामकाज बंद पडलं तरी ही मंडळी नेहमीच आर्थिक फायद्यातच असतात. मल्टीस्टेट बंद पडल्यानंतर ज्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मल्टीस्टेटमध्ये अडकतात, ते आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडून जातात. त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय मार्गच शिल्लक राहत नाही. अशावेळी मल्टीस्टेट किंवा पतसंस्थेच्या कार्यालयातले अधिकारी पुन्हा एक डाव टाकतात.
ठेवीदारांची आर्थिक गरज ओळखून हे अधिकारी ठेवीदारांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवतात. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम फक्त ५० टक्केच द्यायची. ठेवीदाराची सही मात्र १०० टक्के रक्कम दिलेल्या कागदपत्रांवर घ्यायची. ठेवीदाराना ५० टक्के रक्कम दिल्यानंतर जी ५० रक्कम उरते, त्या रकमेतली १० टक्के रक्कम चेअरमन आणि अन्य अधिकाऱ्यांमध्ये वाटून घ्यायची आणि ४० टक्के रक्कम दुसऱ्या एखाद्या कर्जदाराचं कर्ज निल करण्यासाठी वापरायची, असा ‘फंडा’ ही मंडळी सर्रासपणे राबवित आहेत. तेव्हा या मंडळींचा हा कपटी डाव विचारात घ्या आणि वेळीच सावध व्हा. तूर्तास इतकंच. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू, अशाच आगळ्यावेगळ्या माहितीसह या लेखमालेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.