अहिल्यानगरमल्टीस्टेटचा आटापिटा फक्त 'बड्या धेंडां'च्या पतपुरवठ्यासाठीच ; ठेवीदारांनो ! आता...

मल्टीस्टेटचा आटापिटा फक्त ‘बड्या धेंडां’च्या पतपुरवठ्यासाठीच ; ठेवीदारांनो ! आता तरी डोळे उघडा…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर

पतसंस्थेत आर्थिक घोटाळा करायचा, तो घोटाळा दडपून टाकण्यासाठी काही लाखांत मल्टीस्टेटचं लायसन विकत घेऊन सर्वसामान्यांना आकर्षक व्याजाचं ‘गाजर’ दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी (डिपॉझिट) गोळा करायच्या. मात्र सर्वसामान्य माणूस कर्ज मागायला आला, की गोड बोलून त्याला समजणार नाहीत, अशी काही तरी कारणं सांगून त्याला टाळायचं. पण एखादा राजकारणी किंवा उद्योजक कर्ज मागायला आला, की त्याला अक्षरशः पायघड्या टाकायच्या.

एकंदरीत मल्टीस्टेटचा हा जो काही आटापिटा सुरु आहे, तो फक्त ‘बड्या धेंडां’च्या पतपुरवठ्यासाठीच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सापत्नभावाची वागणूक देणाऱ्या या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवण्यापूर्वी तमाम ठेवीदारांनी आता तरी डोळे उघडावेत, एवढीच माफक अपेक्षा या लेखाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.

हा लेख लिहीत असताना आमच्या मनात पुन्हा पुन्हा तेच पण महत्त्वाचे प्रश्न येत आहेत. राज्यातल्या आणि नगर जिल्ह्यातल्या सर्वच मल्टीस्टेटमध्ये किती कोटींच्या ठेवी आहेत आणि किती कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे?

मल्टीस्टेटचं लायसन नक्की कोणतं आहे? या मल्टीस्टेटचं संचालक मंडळ कोणतं आहे? या संचालक मंडळात कोणाकोणाची वर्णी लावण्यात आलेली आहे? या मल्टीस्टेटचा एनपीए किती आहे? भाग भांडवल, गंगाजळी किती आहे? या मल्टीस्टेटचा ताळेबंद कधी सादर केला जातो? या मल्टीस्टेटच्या खरोखर (कागदोपत्री नव्हे) इतर कोणकोणत्या राज्यांत शाखा आहेत?

या सर्वच मल्टीस्टेट्सनी ताळेबंद, तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक कधी जाहीर केलंय का? खरं तर हे सारे महत्वाचे प्रश्न मल्टीस्टेटमध्ये ठेवी ठेवण्यापूर्वी ठेवीदारांच्या मनात उपस्थित व्हायला हवेत. मात्र ज्यांच्याकडे मुबलक पैसा असतो, त्यांच्याकडे तेवढीच मुबलक अक्कल असतेच असं नाही, या न्यायाप्रमाणे करोडो रुपयांच्या ठेवी या मल्टीस्टेटमध्ये ठेवल्या जाताहेत.

मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष अशी करताहेत बनवाबनवी…!

‘आपल्या मल्टीस्टेटमध्ये पंधरा हजार कोटी परदेशातून ‘फंडिंग’ होणार आहे. यापूर्वी अनेकांनी आमच्याकडे डिपॉझिट ठेवलं आहे. पैशांची चिंता करु नका. तुमचे पैसे कुठंही जाणार नाहीत’, अशी मोठमोठी प्रलोभनं दाखवून डिपॉझिट अर्थात ठेवी गोळा केल्या जाताहेत. ठेवीचा हा सारा पैसा ‘क्रिप्टो करंसी’, ‘फॉरेक्स ट्रेडिंग’ किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतविला जातो. तिथं दगा फटका झाला, की मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष स्वतःचं तोंड काळं करुन पळून जातो आणि ठेवीदार मात्र पश्चाताप करत बसतात. मल्टीस्टेटच्या या संस्थापक अध्यक्षांची ही बनवाबनवी ठेवीदारांच्या लक्षात का येत नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

पोलिसांना का सापडत नाहीत ‘भाग्य लक्ष्मी’चे भारत पुंड…?

नगर शहरातल्या पाईपलाईन रोड परिसरात असलेल्या शेजवळ हाईट्स या प्रशस्त इमारतीमध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थेचं कार्यालय होतं. मात्र ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्यानं आणि ठेवीदारांनी ठेवी परत मागायला सुरुवात केल्यानं या वित्तीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत पुंड फरार झाले. मात्र दोन महिन्यांच्या कालावधीनंतरदेखील पोलिसांना ते सापडू शकले नाहीत. भारत पुंड नक्की कुठं गेले, पोलिसांना ते का सापडत नाहीत, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं ठेवीदारांमधून उपस्थित केले जात आहेत.

एमआयडीसी पोलिसांचं हास्यास्पद कारण आणि आमदार तनपुरेंना दिलेला ‘तो’ शब्द…!

भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत, त्यापैकी काही ठेवीदार नगरचे ॲडिशनल एस. पी. प्रशांत खैरे यांना भेटले. त्यावेळी खैरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावला आणि आरोपींना आतापर्यंत अटक का केली नाही, अशी विचारणा केली. त्यावर या मल्टीस्टेटचं ‘ऑडिट’ झालेलं नाही, असं हास्यास्पद उत्तर देण्यात आलं. वास्तविक पाहता आरोपींच्या अटकेचा आणि ऑडिटचा फारसा संबंध नाही. मात्र तरीही आरोपींना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना अपयश का येत आहे, याचं उत्तर देवालाच माहीत आहे. दरम्यान, या आर्थिक घोटाळ्यातल्या आरोपींना येत्या सात दिवसांत अटक करतो, असा शब्द एमआयडीसी पोलिसांनी नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना दिला आहे. तर आरोपींना लवकरात लवकर अटक करु, अशी ग्वाही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी ॲडिशनल एस. पी. खैरे यांना दिली आहे. मात्र हे सारं खरं होईल का, हेच आता पाहायचं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या