अहिल्यानगरमल्टीस्टेटचा दरोडा भाग : ३ ठेवीदारांनो, जास्त व्याजाच्या 'गाजरा'ला भुलून जाऊ...

मल्टीस्टेटचा दरोडा भाग : ३ ठेवीदारांनो, जास्त व्याजाच्या ‘गाजरा’ला भुलून जाऊ नका… मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला जरा ‘हे’ विचारा ना!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

साधी भोळी माणसं काबाडकष्ट करून पोटाला चिमटा घेऊन मुलीच्या लग्नाचा बेत पुढे ढकलून घामाच्या धारांनी भिजलेली कष्टाची कमाई मल्टीस्टेटमध्ये डोळे झाकून ठेवतात. कारण या ठेवींवर जास्तीत जास्त व्याज मिळेल, अशी त्यांना आशा असते. किंबहुना संबंधित मल्टीस्टेटचे चेअरमन त्यांना अशी ‘गाजरं’ नेहमी दाखवत असतात. मात्र प्रत्यक्षात हे सगळं मृगजळ ठरतं. त्यामुळे आम्हाला यानिमित्तानं ठेवीदारांना असं आवाहन करायचंय, की मल्टीस्टेटमध्ये गुंतविलेल्या पैशांवर जास्त व्याज मिळेल, अशा ‘गाजरा’ला तुम्ही अजिबात भुलून जाऊ नका.

मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला संबंधित मल्टीस्टेटचा एनपीए किती आहे? सभासद संख्या किती आहे? वसूल भाग भांडवल किती आहे? गंगाजळी आणि इतर निधी किती आहे? मल्टीस्टेटचे कार्यक्षेत्र किती राज्यांत आहे? मल्टीस्टेटचा नोंदणी क्रमांक काय आहे? सर्व संचालक मंडळाचे संपर्क नंबर काय आहेत? मल्टीस्टेटने वार्षिक लेखाजोखा ठेवला आहे का? मल्टीस्टेटचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक, तेरीज पत्रक, मल्टीस्टेटचा सीडी रेषो काय आहे? मल्टीस्टेटनं एकूण किती ठेवी गोळा केल्या आहेत? एकूण किती रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे? मल्टीस्टेटची थकबाकी किती आहे? मल्टीस्टेटचा नोंदणी परवाना आणि शाखा विस्तारीकरणाचा परवाना संबंधित मल्टीस्टेट कडे आहे का? संचालक मंडळ अस्तित्वात असेल तर त्या संचालक मंडळासह चेअरमनचा फोन नंबर मिळेल का? ही सर्व माहिती तुम्ही गुंतवणूक करणाऱ्या किंवा यापूर्वी गुंतवणूक केलेल्या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला आणि चेअरमनला एकदा विचाराच.

आपल्या भोळसरपणाचा कोणी गैरफायदा घेत असेल तर तो कितपत घेऊ द्यायचा, एखाद्याने गाजर दाखवलं तर त्यावर किती विश्वास ठेवायचा, जास्तीत जास्त व्याज मिळतंय म्हणून कुठंही कष्टाची पुंजी ठेवायला तुम्ही म्हणजे सर्व ठेवीदार ही काही ‘शेंबडी पोरं’ नाहीत. गुंतवणूक करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका उपलब्ध असताना अशा मल्टीस्टेट आणि पतसंस्थेच्या दारात तुम्ही जाताच कशाला? तुमच्या ठेवीवर तुम्हाला जास्त व्याज मिळतं म्हणून तुम्ही कोणाचाही सल्ला न घेता गुंतवणूक करता. मात्र आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तुम्हाला पोलीस आठवतात. वास्तविक पाहता पोलिसांना विचारुन तुम्ही हा ‘उद्योग’ केला होता का?

‘हा’ तर मल्टिस्टेटच्या चेअरमनचा बाप निघालाय…!

मल्टीस्टेटचा दरोडा ही लेखमाला सुरू असताना आम्हाला बरीच माहिती मिळालीय. ती माहिती इतकी आहे, की या मालिकेचे शेकडो भाग होऊ शकतात. दरम्यान, ही मालिका आम्ही सुरू ठेवणारच आहोत. पण हे करत असताना मल्टीसिटी निधी बँक असा एक प्रकार मध्यंतरी नगरमध्ये आला होता. अनेक पुरस्कार विकणाऱ्या नगर तालुक्यातल्या एका तरुणानं 40 ते 50 कोटी रुपयांना गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती आमच्या हाती आली आहे. एका प्रसिद्ध क्रिकेटरला आर्थिक मदत केल्याचा आव आणणारा हा तरुण सध्या कुठं आहे? ज्या लोकांनी या तरुणाकडे ठेवी ठेवल्या, तेच आता या तरुणाला शोधत आहेत. यावरदेखील एक स्वतंत्र लेखमाला लवकरच सुरु करत आहोत. तूर्तास इथंच थांबत आहोत. पुन्हा भेटू पुढच्या भागात. यापेक्षा आणखी धक्कादायक माहिती घेऊन. धन्यवाद.

आणखी महत्वाच्या बातम्या