महाविकास आघाडीच्या सरकारनं सन 2017 साली कर्जमाफीची घोषणा केली होती, त्या घोषणाची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं करण्यात आली असल्याचा आरोप करत नेवासे तालुक्यातले शेकडो शेतकरी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातल्या मंचर या निवासस्थानी प्राणांतिक उपोषण करण्यासाठी निघाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी ते मंचर इथं पोहोचतील आणि त्यांच्या प्राणांतिक उपोषणाला सुरुवात होईल. प्रारंभी या शेतकऱ्यांना नेवासे तालुक्यातले नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शेटे पाटील यांनी त्यांच्या शिवसंग्राम पक्षाच्यावतीनं जाहीर पाठिंबा दिला.
या आंदोलनासंदर्भात शेतकरी नेते त्रिंबक भदगले यांनी भूमिका स्पष्ट करताना आंदोलकांना योग्य असं मार्गदर्शन केलं. लोकशाहीच्या मांडवाखाली हे काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र भारतात या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आर्थिकदृष्ट्या गुलाम झाला आहे. या परिस्थितीला केवळ सत्ताधाऱ्यांचं चुकीचे धोरणच कारणीभूत आहे, असा घणाघाती आरोपदेखील भदगले यांनी केला
कर्जमाफीच्या संदर्भात नेवासे तालुक्यातल्या करजगाव परिसरातल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ऐन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शेकडो शेतकरी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातल्या निवासस्थानी प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात आहेत. या प्राणांतिक उपोषणामागची भावना आंदोलकांनी रोखठोक 24 न्यूज नेटवर्क बोलताना व्यक्त केली.
या धडक मोर्चात जास्तीत जास्त संख्येनं शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी 2017 साली कर्जमाफी केली. पुन्हा त्यांचंच सरकार आलं. मात्र दोन पंगती वाढल्यानंतर त्यांनी जेवणाचा कार्यक्रम बंद केला आणि सर्वांनाच उपाशी ठेवलं
परंतू जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी प्रांतिक उपोषण करतच राहणार आहोत, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.